
मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका चौफुलीजवळ गेल्या रविवारी झालेल्या ट्रक-टेम्पो अपघातात गंभीर जखमी असलेला इयत्ता दहावीतील अरबाज खान (१५) याचे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या अपघातातील मृतांची संख्या आता आठ झाली आहे.
सह्याद्रीनगर भागातील एका नागरिकाचा् धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना रविवारी भाविकांचा टेम्पो सळयांनी भरलेल्या ट्रकला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात अरबाज खान (रा. जायभावे चाळ, सिडको) गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होता. दरम्यान मृत्यूशी झुंज सुरू असताना उपचारादरम्यान गुरुवारी अरबाजची प्राणज्योत मालवली. या अपघातात यापूर्वी पिता-पुत्रासह सख्ख्या भावांचे असे एकूण सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.
मयत अरबाज हा मोरवाडीजवळ असलेल्या स्वामी विवेकानंद या शाळेत इयत्ता दहावीत होता. अभ्यासात अत्यंत हुशार असल्याने तो शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता. अरबाज याचा गुरुवारी शाळेचा शेवटचा दिवस होता. पुढच्या महिन्यापासून बोर्डाचे पेपर असल्याने गुरुवारी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हा कार्यक्रम ठेवला होता. मात्र, निरोप समारंभाच्या दिवशीच अरबाजचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शाळेसह सिडको परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अरबाजचे वडील एका हॉटेलमध्ये काम करत असून, अरबाजचा भाऊ वडिलांबरोबर हॉटेलमध्येच काम करतो. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने लहानपणापासूनच त्यांना कामे करावे लागत होते. अरबाजच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी व भाऊ असा परिवार आहे. गौळाणेतील कब्रस्तानात त्याच्यावर दफनविधी करण्यात आले.