
शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आमदार भास्कर जाधव उध्दव ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जाधव यांनी नुकतीच आपली पक्ष नेतृत्वावरची नाराजी व्यक्त केली होती.
कोकणातून ठाकरे गटाचे निवडून आलेले ते एकमेव आमदार आहेत.Bhaskar Jadhav
विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता ठाकरे गटाच्या काही नेत्यांकडून पक्षातील नेत्यांवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली जात आहे. भास्कर जाधव यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे, असं विधान करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. .
ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी सूचक भाष्य केलं आहे. ‘ठाकरे गटातून पुढच्या ८ दिवसांत शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे’, असं विधान सामंत यांनी केलं आहे.
उदय सामंत म्हणाले, १८ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री तरमी १९ तारखेला दावोस दौऱ्यावर जाणार आहे. २४ तारखेला पुन्हा येणार आहे. त्यामुळे २४ तारखेपर्यंत आपण वाट पाहावी. आपल्याला अपेक्षित असलेला आणि जनतेला अपेक्षित असलेला असा शिवसेना ठाकरे गटातून पुढच्या ८ दिवसांत शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे.
मी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ज्या प्रकारे बदलली आहे. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांना आता वाटतं की आम्हीच बरोबर होतो. त्यामुळे आता ठाकरे गटाचे लोक आमच्याकडे येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचं सांगायचं झालं तर ठाकरे गटाची काँग्रेस जशी झाली आहे, तशी संघटनात्मक काँग्रेस रत्नागिरीत झालेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांना भास्कर जाधव यांच्या विधानासंदर्भात प्रश्नावर उदय सामंत म्हणाले, “भास्कर जाधव असं म्हणाले होते की, शिवसेना ठाकरे गटाची काँग्रेस झाली. त्यांच्या या विधानाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी असं म्हटलं की, शिवसेना ठाकरे गटाची ३ वर्षांपूर्वीच काँग्रेस झाली. त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा जपत आहोत. पण भास्कर जाधव यांची सध्या कुंचबणा होत असेल. आशीच कुंचबणा आमची तीन वर्षांपूर्वी झाली होती, म्हणून आम्ही उठाव केला होता. त्या अनुषंगाने मी असं म्हटलं की जर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भास्कर जाधव यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं तर आमच्यासाठी फायद्याचं असेल.