
तुटला तर दुरस्तीला पाठवला जर्मनीला !
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका चष्म्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसंच आहे. एक 16 हजार रुपये पगार असलेल्या कंत्राटी क्लर्कने तब्बल 21 कोटींचा घोटाळा करून 16 लाखांचा चष्मा वापरला, त्याच घोटाळा प्रकरणात आता पोलिसांनी हा चष्मा जप्त केला आहे.
पण गंमत म्हणजे, एका वादावादीमध्ये हा चष्मा तुटला. त्यामुळे 2 लाख रुपये खर्च करून तो दुरुस्तीसाठी थेट जर्मनीला पाठवला. या पठ्याने असे ५ चष्मे विकत घेतले होते.
विभागीय क्रीडा संकुलाचा 21.59 कोटींच्या घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. पोलिसांकडून या सर्व रक्कमेतून घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्षकुमार क्षीरसागरने खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू असून, पाच चष्यांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठविलेला 16 लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा पोलिसांनी जप्त केला. हर्षकुमार क्षीरसागर याने संकुलासाठी आलेल्या निधीतून 21.59 कोटी रुपये ढापले. त्यातून आलिशान फ्लॅट, महागड्या गाड्या, हिरेजडित चष्यांसह विदेशी वाऱ्याही केल्या. हर्षकुमारने घोटाळ्याच्या रकमेतून 40 लाख रुपयांचे पाच चष्मे खरेदी केले होते. एका वादाच्या दरम्यान त्याचा यातील एक १६ लाख रुपयांचा 180 हिऱ्यांचा चष्मा फुटला होता. तो दुरुस्तीसाठी त्याने विक्रेत्याच्या माध्यमातूनच जर्मनीला अडीच लाख रुपयांमध्ये पाठविला होता. पोलिसांनी त्याच विक्रेत्याच्या माध्यमातून तो पुन्हा मागवून जप्त केला.
एका वादावादीच्या घटनेत हर्षकुमारचा 16 लाखांचा गॉगल तुटला होता. 180 हिऱ्यांनी मढवलेला हा गॉगल तुटल्यानंतर हर्षकुमारनं विक्रेत्यांच्या माध्यमातून तो दुरुस्तीसाठी थेट जर्मनीला पाठवला होता. गॉगलच्या दुरुस्तीचा खर्चही अडीच लाखांच्या घरात होता. पोलिसांनी त्याच विक्रेत्याच्या माध्यमातून हा गॉगल जप्त केला.
“आम्ही बनवलेला हा गॉगल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 16 लाखाचा हा गॉगल एवढा महाग का हा लोकांना प्रश्न पडलाय. हा कष्टमाईज गॉगल आहे. हा गॉगल लिमिटेड एडिशनचा आहे म्हणजेच कस्टमरला त्यामध्ये काय काय हवंय त्यानुसार बनवल्या जातो. याच्यासाठी वापरल्या जाणार साहित्य हे प्लॅटिनम कोटेड धातू आहे.
जगातील सगळ्यात महागडा हा प्लॅटिनम धातू असून, इगोनी आणि अबोनिया या दोन वूडचं कॉम्बिनेशन त्यात आहे. गॉगलच्या दोन्ही बाजूने 90, 90 असे 180 हिरे आहेत.त्यामुळे हा गॉगल एवढा महाग आहे” अशी माहिती गॉगल बनवून देणाऱ्या ओम ऑप्टिकल मालकीण मीनल देशपांडे यांनी दिली.
घोटाळा करून आलिशान आयुष्य जगणारा हर्षकुमार आपल्या साथीदारांसह जेलची हवा खातोय. हर्षकुमार जेलमध्ये असताना देखील त्याचा हात चष्मा संभाजीनगरमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.