
नाशिकमधील बड्या नेत्यांचा मनसे, ठाकरे गटाला ‘रामराम’
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर आगामी महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन दिवसांपासून काँग्रेसच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील नाशिकरोडच्या ठाकरे गटाच्या चार टर्म नगरसेविका असलेल्या माजी उपमहापौर, व्यापारी बँकेच्या संचालिका रंजना बोराडे आणि सिडकोतील दीपक दातीर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. या पाठोपाठ आता नाशिकमधील आणखी दोन बड्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.
विधानसभा निवडणुकी आता महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महापालिकेची तीन वर्षांपासून निवडणूक झालेली नाही. राज्यात भाजप-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांची सत्ता आहे. आगामी महापालिकेची निवडणूक लढायची असेल तर सत्तेतील पक्ष सोबत हवा. विरोधी बाकांवर बसून करायचे काय? ही भावना माजी नगरसेवकांमध्ये झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटात मोठं इनकमिंग सुरु असल्याचे दिसून येत आहे.
पवन पवार, योगेश शेवरे शिवसेनेत दाखल
आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नाशिकच्या दोन माजी नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ -दिप निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सभापती पवन पवार तर मनसेचे माजी नगरसेवक सभापती योगेश शेवरे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केलाय. तर शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यातदेखील बडे प्रवेश होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे मात्र विरोधी पक्षांत कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
मिरा भाईंदरमधील माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
मिरा भाईंदर शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक बर्नड डिमेलो आणि माजी नगरसेवक जार्जी गोविंद यांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.