
शिंदे-अजित पवारांना संपवण्यासाठी फडणवीसांचा डाव…
राज्यावर असं कोणचं संकट कोसळलं होतं की छगन भुजबळ याला मंत्री करावं लागलं. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबद्दल असलेला द्वेष यातून पुन्हा एकदा दिसून आला आहे.
मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्री केलं, अस आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.
छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासून राज्यभरात त्याबद्दल उलट-सुलटं चर्चा सुरू आहेत. अजित पवारांचा विरोध असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच भुजबळांना मंत्री केलं, असंही बोललं जातं. या सगळ्या चर्चा आणि विषयावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करतांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ओबीसी आणि मराठा अशा दोन्ही समाजाची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचं काम फडणवीस करत आहेत.
राज्याच्या मंत्रीमंडळात छगन भुजबळ यांना घेण्यासारखी अशी काय परिस्थिती उद्धभवली होती. या आधी कॅबिनेटच्या बैठका, निर्णय होतचं होते. पण मराठा आरक्षणाला विरोध करून राज्यात पुन्हा मराठा-ओबीसींमध्ये वाद निर्माण करायचा आणि दंगली भडकवायच्या असा फडणवीस यांचा डाव आहे. याआधी त्यांनीच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राज्यभरात सभा घ्यायला लावल्या, त्यातून तलवारी काढण्याची भाषा करायला लावली. मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांनाही हे आता कळायला लागलं आहे.
मराठा आणि ओबीसी समाजाच्या आमदारांनाही माझी विनंती आहे, की त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जातीय राजकारणाला बळी न पडता समाजाचे हित पहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे कुठेलही भले करू शकत नाही. त्यांना आणल्याने समाजाचा आणि सत्ताधाऱ्यांचा कोणताही फायदा होणार नाही. फडणवीस यांनी मराठा समाजाच्या लेकी-बाळींवर गोळ्या चालवल्या, लाठ्या चालवल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या.
अनेक लेकी-बाळीच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले. आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबाला दहा लाख रुपये आणि नोकरी देण्याचा निर्णय झाला होता, पण तो देखील फडणवीस यांनी बदलला, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे काम भागले आहे. त्यांना आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील नको आहेत. त्यांना संपवण्याचा डाव फडणवीस यांनी टाकला आहे.
नाराज मुंडेंना वर्षावर घेऊन जावे लागले..
धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद छगन भुजबळ यांना दिल्यानंतर ते नाराज झाले. त्यानंतर अजित पवार यांनी हा निर्णय माझा नाही, मुख्यमंत्र्यांचा आहे, हे सांगावे लागले. अगदी मुंडेंना सोबत घेऊन अजित पवार मुख्यमंत्र्यांकडेही गेले होते. तिथे मीच भुजबळांना मंत्री केले, हा निर्णय अजित पवारांचा नाही, तर माझा आहे, हे सांगितले गेले, असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हा देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा यात काही रोल नाही, त्यांनीही फडणवीस यांच्यापासून सावध राहावे, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.