
बांगलादेशातील निवडणुका मोहम्मद युनूस यांनी पुन्हा टाळल्या !
बांगलादेशमधील परिस्थिती कठीण झाली आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन सुरु आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून अनेक शहरांमध्ये आंदोलन केले जात आहे.
ढाका शहरात भयग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कधीही काहीही होऊ शकते, अशी भीती लोकांना आहे. शिक्षकांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, परिस्थिती खराब असल्याचे कारण देत पुन्हा एकदा मोहम्मद युनूस यांनी निवडणुका टाळल्या आहेत. त्यांनी आपला कार्यकाळ एक वर्ष वाढवून घेतला आहे.
बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी निवडणुका पुन्हा सहा महिने पुढे ढकलल्या आहेत. आतापर्यंत डिसेंबर २०२५ पर्यंत निवडणुका घेण्यात येणार असल्याचे ते सांगत होते. परंतु आता पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत निवडणुका घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते ३० जूनपर्यंत पदावर कायम राहणार आहे. देशात युद्धासारखी परिस्थिती आहे, असे सांगत युनूस यांनी निवडणुका टाळल्या आहेत. दुसरीकडे बांगलादेशातील राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याची मागणी रेटून धरली आहे. त्यासाठी बांगलादेशात उग्र आंदोलन सुरु आहे.
व्यापारी संघटना काय म्हणते…
व्यापारी संघटनेचे प्रमुख शौकत अजीज रसेल यांनी म्हटले की, युनूस सरकारने व्यापाऱ्यांवर १९७१ मधील परिस्थिती पुन्हा आणली आहे. त्या काळात मुक्ती संग्राममधील बुद्धिजीवी लोकांनी व्यापाऱ्यांवर कठीण परिस्थिती आणली होती. सध्या दुष्काळसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. बेरोजगारी वाढत आहे. बांगलादेश टेक्सटाइल्स मिल्स असोसिएशनचे (बीटीएमए) अध्यक्ष रसेल यांनी सांगितले की, आम्ही ईद-उल-अजहापूर्वी कामगारांना पगार आणि बोनस देऊ शकतो की नाही, हे सांगता येत नाही. सरकार गुंतवणूकदरांना आमंत्रित करत आहे. पण गुंतवणूकदारांना देशातील परिस्थिती माहिती आहे. गुंतवणूकदार बांगलादेशात येणार नाही.
दरम्यान, मोहम्मद युनूस यांनी आपला कार्यकाळ वाढवताना म्हटले की, पुढील वर्षी ३० जूननंतर एक दिवससुद्धा पदावर थांबणार नाही. रविवारी सर्व राजकीय पक्षांसोबत युनूस यांनी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. त्यानंतर युनूस यांचे माध्यम सल्लागार शफीकुल आलम यांनी माध्यमांना त्या बैठकीतील माहिती दिली.