
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला. या दरम्यान, 10 मे रोजी दोन्ही देशांनी युद्धविराम घोषित केला.
पण, याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावरुन राजकारण तापले आहे. विरोधी पक्ष अजूनही केंद्र सरकारवर अमेरिकेच्या दबावाखाली युद्धविराम जाहीर केल्याचा आरोप करत आहे. सरकारने वारंवार विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले आहे. आता पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या दाव्यांचे खंडन केले अन् पाकिस्तानला कडक शब्दात इशाराही दिला.
परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीच्या बैठकीत एस. जयशंकर यांनी सहभाग घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्यांनी परकीय हस्तक्षेपावर भाष्य केले. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा कोणत्याही देशाने आम्हाला भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत विचारले, तेव्हा आम्ही त्यांना फक्त एवढेच सांगितले की, समोरुन गोळीबार झाला, तर आम्हीदेखील जोरदार प्रत्युत्तर देऊ. याशिवाय, सिंधू पाणी कराराबद्दल म्हणाले की, जे काही होईल, ते देशाच्या हिताचे असेल आणि चांगलेच असेल.
अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल काय म्हणाले ?
जयशंकर पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यानंतर जेव्हा अमेरिकन सचिवांनी सांगितले की, पाकिस्तान मोठा हल्ला करू शकतो, तेव्हा आम्ही उत्तर दिले की, जर पाकिस्तान मोठा हल्ला करेल, तर आम्ही त्यापेक्षा मोठा हल्ला करण्यास तयार आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीसंदर्भातील पोस्टवर परराष्ट्रमंत्री म्हणाले, दोन्ही डीजीएमओंमधील चर्चेमुळे युद्धविराम झाला, त्यात कोणत्याही देशाची भूमिका नव्हती. हा आमचा द्विपक्षीय मुद्या, यात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य नाही, असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला दिली?
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या एका व्हिडिओ क्लिपवरुन मोठा वाद झाला आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला आधीच दिल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर स्पष्टीकरण देताना जयशंकर म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरपूर्वी नाही, तर ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला माहिती देण्यात आली होती.