
विलासराव देशमुखांचे निकटवर्तीय; माजी आमदार अजितदादांच्या गळाला…
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे, चार दशकांहून अधिक काळ काँग्रेस पक्षाच्या तत्वाशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटन वाढविण्यासाठी लढणारे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसचा ‘हात’सोडला आहे.
सानंदा हे येत्या 12 जून रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सलग 3 टर्म काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झालेले सानंदा गेले अनेक महिने पक्षावर नाराज होते. शेवटी त्यांनी कंटाळून 31मे रोजी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सदस्य पदाचा राजीनामा पाठवला आहे.
मी माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या क्रियाशील सदस्य पदाचा व माझ्याकडे जी काही काँग्रेस पक्षाच्या संघटनेची पदे असतील त्यांचा राजीनामा देत आहे. तरी माझा राजीनामा त्वरित स्वीकारावा, असे सानंदा यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित खामगाव येथे १२ जून रोजी दिलीपकुमार सानंदा हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमांच्या तयारीसाठी आज (५ जून) रोजी खामगाव येथे राष्ट्रवादीचे अमरावती विभागाचे समन्वयक आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन केले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मी खामगाव विधानसभा मतदार संघाचा काँग्रेस पक्षाचा पक्षनेता असतांना मला विश्वासात न घेता काही जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. भाजपाच्या उमेदवारालानिवडूण आणण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत केली, असा गंभीर आरोप सानंदा यांनी केला आहे.