
सिंहस्थ कुंभमेळा तयारीच्या बैठका आणि त्यातील राजकारण चव्हाट्यावर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. त्यावरून शिवसेना ठाकरे समर्थक आणि मुख्यमंत्री यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच सिंहस्थ कुंभमेळ्याची बैठक झाली. सर्व तेरा आखाड्यांच्या प्रमुख साधूंच्या उपस्थितीत या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.
या बैठकीवरूनच आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. या बैठकीला खासदार राजाभाऊ वाजे यांना निमंत्रण देण्यात आले नाही. पूर्वीच्या विविध बैठकांना देखील जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप होत आहे. यावरून आता राजकारण पेटण्याची चिन्ह आहे.
या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, पण येथे सुनील बागुल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री तसेच यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या बैठकांना देखील खासदारांना निमंत्रण का दिले नाही? याचा जाब विचारण्यात आला.
खासदार वाजे यांना बैठकीसाठी निमंत्रण न देणे हा नाशिक जिल्ह्यातील मतदारांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीसाठी विविध लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना देखील निमंत्रण करण्यात आले होते. मग खासदार वाजे यांना का टाळले?. खासदार वाजे हे जिल्ह्यातील आणि शहरातील मतदारांचे प्रतिनिधित्व करतात. विविध विकास कामे आणि समस्या याबाबत संयुक्त कुंभमेळ्यात अपेक्षित सूचना त्यांना करण्यापासून वंचित ठेवले जाते. सिंहस्थ कुंभमेळा हा काही फक्त सत्ताधारी पक्षाचा अजेंडा आहे का? असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.
यापूर्वीही जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना जाणीवपूर्वक बैठकांना टाळण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व चौदा आमदार महायुतीचे आहेत. मात्र नाशिकचे खासदार वाजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तर दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आहेत.मालेगावच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव काँग्रेसच्या आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात आमदार महायुतीचे तर खासदार महाविकास आघाडीचे असल्याने राजकीय ताणतणाव वाढला आहे. त्या वादाची ठिणगी काल पडली.