
मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका !
मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाले आहेत. ‘२९ ऑगस्टला मुंबईत येणार असून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही.’, असं मनोज जरांगे यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह हुंडाबळीच्या घटनेवर आपले मत मांडले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. ‘फडणवीस विचित्र माणूस आहे. त्यांनी मराठा द्वेष बाजुला केला पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनीच विल्हेवाट लावली’, असा आरोप जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना सांगितले की, ‘फडणवीस यांच्या मनात जातीय दोष आहे का नाही? हे पाहावं लागेल. चार महिने वेळ दिला आहे. फडणवीस यांना दोन वर्षे झाले वेळ दिला. मराठा आणि कुणबी एक आहे त्यांनी जीआर काढला पाहिजे. अनेक केसेस तशाच आहेत त्या मागे घेतल्या नाहीत. फडणवीस विचित्र माणूस आहे. त्यांनी मराठा द्वेष बाजूला केला पाहीजे. आमचं त्यांचं शत्रुत्व नाही. फडणवीस यांनी आया-बहिणींचे डोके फोडले म्हणून फडणवीस यांच्याविरोधात मी बोलतो.
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी यावेळी मनोज जरांगेंनी कानाला हात लावला. ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी विल्हेवाट लावली. या प्रकरणाचा पूर्ण कार्यक्रम केला. आरोपीच्या वतीने वकिलाने बाजू मांडली. मोक्यातून दोषमुक्त करा. हरकत नाही असं सरकारी वकील म्हणत आहेत. फडणवीस शाळेत जोड्या लवायला पक्का असणार. लोकांनी शहाणं होणं गरजेचे आहे. पापत सहभागी मी होणार नाही.’, असे जरांगे यांनी स्पष्टपणे सांगत फडणवीसांवर टीका केली.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी हुंडाबळीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘श्रीमंत लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हुंड्याचं परिवर्तन व्यवसायात केलं पाहिजे. दोन्ही कडचा होणारा खर्च व्यवसायाला द्यायचा. मुलीच्या बापाने आणि मुलाच्या बापाने लग्नामध्ये जे पैसे खर्च करतात. ते एकत्र करून मुलाला व्यवसायाला दिले पाहिजेत.