
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज (5 जून) लोकार्पण पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या 76 किमी मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. लोकार्पणानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्ग पूर्ण झाला असून आता शक्तिपीठ महामार्गाचं काम लवकरच सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांना कलाटणी देणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू असून आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. यानंतर आता समृद्धी महामार्गाच्या उर्वरित म्हणजेच 76 किमी लांबीच्या (इगतपुरी ते आमणे) मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबतही भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीच्या कार्यकाळातच समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होत असल्याचा मला आनंद आहे. आता अशाच प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग आम्हाला पुढच्या टप्प्यात करायचा आहे. हा शक्तीपीठ महामार्ग संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलणारा आणि मराठवाड्यात आर्थिक बदल घडवणारा असणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या 76 किमी मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. उर्वरित टप्प्यातील 76 किमीची लांबी नाशिक व ठाणे जिल्ह्यात येते. या टप्प्यामध्ये एकूण 5 दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी 10.73 किमी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.46 किमी) आहे. त्यातील इगतपपुरी येथील बोगदा 8.00 किमी लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे. इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी) हा 76 किमीचा टप्पा वाहतुकीस सुरू झाल्यानंतर ठाणे (आमणे) व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासांत गाठता येणार आहे. तसेच ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल. याशिवाय शिर्डी, अहिल्यानगर व नाशिक जिल्हयातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल.