
मुंबई : निष्पक्ष निवडणुकांच्या बाबतीत विद्यमान फडणवीस सरकारचा ‘रिपोर्ट’ चांगला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकांनी या-ना-त्या कारणाने रखडवून ठेवल्या.
प्रशासकाच्या माध्यमातून पालिका आणि जिल्हा परिषदांचा कारभार चालवला. अखेर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आणि चार महिन्यांत या निवडणुका घ्या, असा आदेश द्यावा लागला, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आता राज्यातील सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतच्या सूचना मंत्रालयातून देण्यात आल्या आहेत. मुंबईत 227 प्रभागांनुसार निवडणुका होतील आणि येथे एकास एक निवडणुका होतील. बाकी महानगरपालिकांत चार सदस्यीय प्रभाग असतील. प्रभाग रचनांची सूचना निघाल्यामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होतील, हे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी राज्य सरकार तयारीला लागले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात नमूद केले आहे.
प्रभाग रचनेत सरकार पक्षाचे लोक मनमानी करतील अशी भीती आहे. निवडणूक आयोगाचे लोक, पालिकांमधील त्यांचे हस्तक प्रभाग रचना ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे करतील आणि गोंधळ घालतील ही भीती रास्त आहे. विशेषतः, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर अशा महानगरपालिकांत अशी चालबाजी होईल, असे लोक गृहीत धरून चाललेच आहेत, असा निशाणा त्यांनी महायुतीवर साधला आहे.