
दुर्दैवी घटनेबद्दल खेळाडूंनी व्यक्त केला शोक…
गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान, ज्यात २४२ प्रवासी होते, टेकऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनंतर मेघाणी नगर परिसरात कोसळले.
या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला, तर क्रीडा विश्वातील खेळाडूंनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. नागरी विमान संचालनालयाने (DGCA) सांगितले की, या विमानात २३१ प्रवासी आणि १० चालक दलाचे सदस्य होते.
विमानातील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता –
या भीषण अपघातात विमानातील २४२ प्रवाशांपैकी कोणताही प्रवासी वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी.एस. मलिक यांनी न्यूज एजेंसी एपीला सांगितले. त्यानुसार विमानातील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमान लोकवस्ती क्षेत्रात कोसळल्याने काही स्थानिकांचाही मृत्यू झाल्याची भीती आहे.
भारतीय क्रिकेटपटूंकडून शोक व्यक्त –
भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू देखील अहमदाबाद विमान अपघाताबद्दल सतत शोक व्यक्त करत आहेत, ज्यामध्ये स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी ट्विट केले आणि लिहिले की “अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल ऐकून मन दुखावले. मी पीडितांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो की त्यांना हे सहन करण्याची शक्ती मिळो.
त्याच वेळी, युवराज सिंगने या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि लिहिले की “अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल हृदयद्रावक बातमी. प्रभावित प्रवासी, कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी संवेदना आणि प्रार्थना. या कठीण काळात त्यांना शक्ती मिळो.
भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजनेही एअर इंडियाच्या विमान अपघातावर दुःख व्यक्त केले, ज्यामध्ये तिने लिहिले की, “अहमदाबादहून एक दुःखद बातमी. एअर इंडियाच्या विमान अपघातात जखमी झालेल्या सर्वांसाठी प्रार्थना.
माजी खेळाडू सुरेश रैनाने या अपघाताच्या बातमीबद्दल लिहिले की, “अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या बातमीने मला पूर्णपणे धक्का बसला आहे. मी प्रार्थना करतो की देव सर्व मृतांच्या पीडित कुटुंबांना शक्ती देवो. या दुःखद क्षणी, आपण सर्वजण शोकात एकजूट आहोत.
शिखर धवनने पोस्ट शेअर करत लिहिले, “मेघानीजवळ झालेल्या विमान अपघातामुळे मन खूप दुखी आहे. या दु:खातून प्रभावित झालेल्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी मनापासून प्रार्थना करतो की त्यांना धैर्य आणि शक्ती मिळो.
भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, अहमदाबादमधून आलेली बातमी खूपच दुखद आणि अस्वस्थ करणारी आहे.
युसुफ पठाणने एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं, “अहमदाबाद-लंडन विमानाचा अहमदाबाद विमानतळाजवळ अपघात झाला. ही बातमी ऐकून धक्का बसला. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असावेत, अशी प्रार्थना आहे.
हरभजन सिंगने आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करत लिहिले, अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो. या दुखद घटनेतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति माझ्या मनापासून संवेदना. त्यांनी सहन केलेल्या वेदना आणि नुकसानासाठी शब्द कमी पडतात. या कठीण प्रसंगी त्यांना शक्ती, धैर्य आणि आधार मिळावा, अशी मी प्रार्थना करतो.