
हे इतकं सोपं नाही; माझी मुलगी…
अहमदाबाद विमान दुर्घटनेतून अजूनही अनेकजण सावरले नाहीयेत. एअर इंडिया फ्लाइट AI-171 चा अपघात मेघाणीनगरमधील BJ मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलजवळ झाला. यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या डॉक्टर्स, विद्यार्थ्यांवरही दुहेरी आघात झाला.
एकीकडे अपघाताचा मानसिक धक्का, तर दुसरीकडे अचानक हॉस्टेल रिकामं करण्याचा प्रशासनाचा आदेश अशा परिस्थितीत अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
13 जून रात्री 9 वाजेपर्यंत हॉस्टेल रिकामं करण्याचे आदेश
प्रशासनाने अपघातानंतर तपासासाठी काही हॉस्टेल इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश दिले. कमी वेळ आणि मानसिक धक्का बसलेलं डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी आपल्या सामानासह लगेचच रात्रीत जागा सोडण्यासाठी धडपडू लागले. त्यातच डॉक्टर अनिल पनवार (Dr. Panwar) यांच्यावर तर दुहेरी संकट ओढावलं. ते राहत असलेली इमारतीला अपघात झाला आणि त्यांच्या मुलीला आणि घरकाम करणाऱ्या महिलेला गंभीर दुखापत झाली. दोघींचाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
माझं कुणीही इथे नाही, फक्त थोडा वेळ द्या
डॉ. पनवार यांनी माध्यमांसमोर भावुक होत अपील केलं, “माझी मुलगी आणि घरकाम काम करणारी बाई रुग्णालयात आहेत. मी गुजरातचा नाही, इथे माझं कुणीही नाही. मी काल अपघाताच्या वेळी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर होतो. अचानक रात्री 9 वाजेपर्यंत हॉस्टेल रिकामं करा सांगितलं जातं आहे. हे इतकं सोपं नाही. कृपया दोन-तीन दिवस वेळ द्या… जरा माणुसकी दाखवा. ते बोलताना त्यांना अश्रू आवरत नव्हते. ते म्हणाले एक दिवस आधी अपघात झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला थेट हॉस्टेल सोडायला सांगितलं. माझी फक्त एकच विनंती आहे थोडा वेळ द्या.
या अपघातामुळे वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयही मोठ्या प्रमाणात मानसिक आणि भावनिक आघात झेलत आहेत, हे त्यांच्या शब्दांतून स्पष्ट झालं.
त्या वेळी मी मानसिकदृष्ट्या अस्थिर होतो
मात्र दुसऱ्याच दिवशी डॉ. पनवार यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला. त्यात ते पूर्वीपेक्षा शांत आणि संयमित दिसत होते. त्यांनी आपल्या पूर्वीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. काल मी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होतो. काही गोष्टी अनावधानाने बोलून गेलो. पण आता सांगू इच्छितो की पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली आहे. आम्हाला सुरक्षित ठिकाणी आश्रय दिला. मी त्यांचा आभारी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
डॉ. पनवार यांनी हेही सांगितलं की अपघातावेळी ते आणि त्यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर होते, तर त्यांची मुलगी आणि घरकाम करणारी बाई हॉस्टेलमध्ये होत्या.