
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एका वाक्यात प्रतिक्रिया !
पुण्यातील इंद्रायणी नदीजवळील पूल कोसळला. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक पर्यटक नदीत वाहून गेले. NDRFच पथकही पोहोचलं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
र 40 पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या पूलाच्या दुर्घटने संदर्भात वेगवेगळी माहिती मिळत आहे. त्या ठिकाणी एन डी आर एफ, नगरपालिका व इतरही पथके गेले आहेत. प्रथमदर्शी असे सांगण्यात येत आहे की ,तो जो पूल होता तो फार सडलेला होता त्यावर अनेक जण उभे राहिले होते तसेच ये जा करत होते. अनेकांनी दुचाकीही नेल्या होत्या. ओझ्यामुळे पूल कोसळला. यापूर्वीच या पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर आहेत. आणखीन सविस्तर माहिती जिल्हाधिकारी देतील. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ येथील पूल दुर्घटनेबाबत दिली आहे.
सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही (NDRF) दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.
जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास देतो.
राज्य शासन या संकटाच्या काळात बाधित नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन अजित पवार यांनी केले आहे.