
पीएम किसानचा 20 वा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता…
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जातात.
पीएम किसान सन्मान निधीची ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. चार महिन्यांच्या अंतरानं पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. पीएम किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. आता चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात 20 व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येऊ शकते. या योजनेचे 10 कोटी लाभार्थी 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम 20 जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम 10 कोटी 4 लाख 67 हजार 693 शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. आता 10 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांना देखील काही गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी, आधार सीडिंग आणि जमीन रेकॉर्ड पडताळणी पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेसाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. केंद्र सरकारनं या योजनेची घोषणा 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. त्याची अंमलबजावणी फेब्रुवारी 2019 पासून करण्यात आली. सुरुवातीपासून आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी योजनेच्या वेबसाईटवर जाऊन किती हप्त्यांची रक्कम मिळाली. यासंदर्भातील माहिती आणि इतर तपशील तपासू शकतात. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 19 हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे. म्हणजेच जे शेतकरी पहिल्या हप्त्यापासून लाभार्थी आहेत त्यांना त्यांना 38 हजार रुपये मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानच्या निधीची प्रतीक्षा
महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मानच्या 6 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. आता त्या योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.