
पहलगाम हल्ला; धर्म या प्रश्नांवर आमिर खान स्पष्टच म्हणाला…
‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटानंतर काही काळ ब्रेक घेतलेला आमिर खान आता पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. त्याचा ‘सितारें जमीन पर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत आमिर त्याच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यामध्ये त्याने पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि आपल्या धर्माबद्दलही रोखठोक प्रतिक्रिया दिली. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये 26 पर्यटकांनी आपले प्राण गमावले होते. हिंदू आहेस की मुस्लीम.. असा धर्मावरून प्रश्न विचारून त्यांच्यावर दहशतवाद्यांनी निशाणा साधला होता.
या मुलाखतीत आमिरम्हणाला, “संपूर्ण जगाला ही गोष्ट समजली पाहिजे की सुरुवात त्यांनी केली होती. त्यांनी आमच्या लोकांना मारलं होतं. ही कोणती पद्धत असते? हा माणुसकीवरील हल्ला आहे. त्यांना त्याबद्दल लाज वाटली पाहिजे. कोणताच धर्म असं म्हणत नाही की तुम्ही निरपराध लोकांना मारा. मी तर दहशतवाद्यांना मुस्लीम मानत नाही. इस्लाममध्ये लिहिलंय की तुम्ही महिलांवर हात उचलू शकत नाही, लहान मुलांना मारू शकत नाही, कोणत्याही निरपराध व्यक्तीचा जीव घेऊ शकत नाही. हे सर्व इस्लामच्या विरोधात आहे.
मला माझ्या सैन्यावर गर्व आहे. जेव्हा कारगिल युद्ध झालं होतं आणि ते आपण जिंकलो होतो, तेव्हा मी एकटाच असा होतो, (माझ्या माहितीनुसार) जो कारगिलमध्ये 8 दिवस राहिलो होतो आणि सर्व रेजिमेंट्सची भेट घेतली होती. मी त्यांना प्रोत्साहन द्यायला तिथे गेलो होतो”, असं तो पुढे म्हणाला. या मुलाखतीत आमिरला धर्माची खिल्ली उडवल्याच्या आरोपाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. आमिर त्याच्या चित्रपटांमध्ये एकीकडे हिंदू धर्माची खिल्ली उडवतो आणि दुसरीकडे लव्ह जिहादला प्रोत्साहन देतो, असा आरोप करण्यात आला. त्यावर आमिरने उत्तर दिलं, “मी प्रत्येक धर्माचा आदर करतो. मी माझ्या चित्रपटांमध्ये हिंदू धर्माचा अपमान केला नाही. मी त्या लोकांबद्दल प्रश्न उपस्थित केला जे धर्माच्या नावाखाली फायदा घेत आहेत.
आमिरने त्याच्या बहिणीचं आणि मुलीचं लग्न हिंदू धर्मात करून दिल्याने मुस्लीम धर्माच्या समर्थकांनी त्याच्यावर टीका केली. गजनी या चित्रपटापर्यंत तरी हा ठीक होता, परंतु नंतर तो विसरला की तो एक मुस्लीम आहे, अशा टीकेवर आमिरची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली. यावर उत्तर देताना आमिर म्हणाला, असं अजिबात नाही. मी मुस्लीम आहे मला मुस्लीम असल्याचा अभिमान आहे. मी हिंदुस्तानी आहे आणि मला हिंदुस्तानी असल्याचा अभिमान आहे. या दोन्ही गोष्टी आपापल्या जागी योग्य आहेत.