
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे आणि गुन्हेगारी प्रकरणे सात दिवसांत बाहेर काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने दिला आहे.
रायगडच्या राजकारणातील ‘थ्री इडियट्स’मधील एका ‘इडियट्स’ने पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली आहे. आता सात दिवसांत या ‘इडियट्स’चे घोटाळे बाहेर काढू, असा इशारा प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे.
पालकमंत्रिपदाच्या वादानंतर रायगड जिल्ह्यातील राजकारणात अजित पवार गट आणि शिंदे गटात कलगीतुरा सुरू आहे. विशेषतः सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले असा हा संघर्ष सुरू आहे. गोगावले यांनी तटकरेंना लक्ष्य केल्यानंतर अजित पवार गटाकडून उत्तर आले आहे. रायगड जिल्हा पालकमंत्रिपदासाठी हपापलेले शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून संवेदनशीलता गेलेली आहे.
गोगावले यांची गुन्हेगार प्रवृत्ती, रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सार्वजनिक बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदमध्ये केलेले घोटाळे आम्ही पुढील सात दिवसांत बाहेर काढणार असल्याचे परांजपे यांनी म्हटले आहे. तटकरे यांच्या भाची सुनेचा विमान अपघातात मृत्यू झाला असून त्यांचे कुटुंब अद्याप त्या दुःखातून सावरलेले नाही. मात्र दुसरीकडे भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदावरून बेछूट आरोप केले आहेत. त्यांनी बोलताना सिंचन घोटाळ्याचा विषय काढला. परंतु सिंचन घोटाळ्याची फाईल कुठे अडकली असेल तर ती त्यांनी बाहेर काढावी, असे खुले आव्हानही परांजपे यांनी यानिमित्ताने दिले आहे.
ठाकरेंवरील टीकेवरूनही गोगावलेंवर निशाणा
ज्या शिवसेनेने तुम्हाला ओळख दिली, राजकारणात वर आणले, त्यांच्यावर अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. मीदेखील शिवसेनेत काम केले आहे. रश्मी ठाकरे या कुटुंबवत्सल आहेत. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये रश्मी ठाकरे यांचा कधीच हस्तक्षेप नसायचा, असे सांगतानाच जिल्हा परिषद सभापती, आमदार ही ओळख तुम्हाला कुणी दिली? जर शिवसेनेने मोठे केले आणि अशा वेळेस रश्मी वहिनींवर आरोप करत असाल तर ते दुर्दैवी आहे, अशा शब्दांत परांजपे यांनी गोगावले यांना सुनावले.