
त्यांना सोबत घेऊन फायदा होणार नाही – रामदास आठवले
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची ताज हॉटेलमध्ये भेट घेतली.
या भेटीनंतर राज ठाकरे महायुतीची वाट धरणार असल्याचेही म्हटले जात होते. यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
‘राज ठाकरेंची भूमिका रोज बदलणारी’
राज ठाकरे यांची भूमिका दररोज बदलते, त्यांना महायुतीमध्ये घेऊन काही फायदा होणार नाही. लोकसभेला राज ठाकरे महायुतीसोबत होते. पण त्यांचा काही फायदा झाला नाही. विधानसभेच्या निवडणूकांच्या वेळी ते आमच्यासोबत नव्हते. त्या वेळेस आम्हाला अधिक जागा मिळाल्या. त्यांची भूमिका रोज बदलणारी आहे. सोबत आल्याने महायुतीला काही फायदा होणार नाही’, असा टोला रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला.
पाऊस बघून छत्री घेण्यापेक्षा रेनकोट घेतलेले कधीही बरं आहे. काँग्रेसची छत्री घेतल्याने डोक शाबूत राहील, पण अंग भिजेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने एनडीएचे रेनकोट घ्यावे’, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
तसेच मुंबई ही बहुभाषिक आहे. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तरी त्यांना तेथे सत्ता मिळणे अवघड आहे. यावेळी मुंबईत महायुतीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. सांगलीच्या जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात माध्यमांसोबत बोलताना ते म्हणाले.