
अमितेश कुमार यांचा इशारा…
पुणे पोलिसांनी टिपू पठाण टोळीच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. टोळीतील सदस्य असलेल्या शाहरुख ऊर्फ अट्टी शेखचा रविवारी (दि. 15) सोलापुरातील लांबोटी गावात पहाटे एन्काउंटर झाला.
त्यानंतर टोळीशी संबंधित असलेल्या साठ जणांची झाडाझडती घेण्यात आली. त्यांना काळेपडळ पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आल्यानंतर प्रत्येकाची कुंडली तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, शाहरुखच्या एन्काउंटरचा शहरातील गुंड आणि त्यांच्या पंटर लोकांनी चांगलाच धसका घेतला आहे. अशातच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी, ‘कोई हाथ उठाएगा, गोली चलाएगा, तो तोड दूँगा,’ असा गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे.
पोलिसांची आक्रमकता पाहून काही गुंडांनी शहरातून पळ काढला आहे. टिपूच्या टोळीतील एकाने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. एवढेच नाही तर उपनगरात मनगटाच्या जोरावर बेकायदा जमिनीचा ताबा मारणार्या गुंडानी धूम ठोकल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले.
वीस लाखांच्या खंडणी प्रकरणात टिपू पठाणसह 17 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये टिपू पठाणसह 9 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, शाहरुखसह आठ सदस्य मागील तीन महिन्यांपासून फरार झाले होते.
यातील शाहरुखचा एन्काउंटर झाल्याने फरार आरोपींची संख्या सात झाली होती. मात्र, एन्काउंटरची खबर मिळताच फरार असलेला राजेश पवार हा स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला. यामुळे उर्वरित फरार सहा सदस्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याची पथके रवाना करण्यात आली आहेत.
टिपू पठाण टोळीतील साठ सदस्यांना दिवसभरात दोनवेळा हजेरीला बोलाविण्यात आले. त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे, त्यांचा सध्याचा पत्ता, मोबाईल नंबर, छायाचित्र आणि त्यांच्या हालचाली, जवळचे नातेवाईक या सर्वांची माहिती पोलिस ठाण्यात नोंदवली जात आहे.
इतकेच नव्हे तर त्यांना पोलिसी भाषेत तंबीही देण्यात आली आहे. शाहरुखच्या एन्काउंटरने मात्र सगळ्या सदस्यांना धडकी भरल्याचे चित्र होते. पोलिसांचा निरोप पोहचताच तत्काळ ते ठाण्यात हजर झाले होते. यापूर्वी टिपू पठाणची धिंडही काढण्यात आली होती.
‘त्या’ तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
शाहरुखच्या मृत्यूनंतर त्याचे उदात्तीकरण करणारे काही रील्स तयार करून तिघांनी स्टेटसला ठेवले होते. हा प्रकार निदर्शनास येताच काळेपडळ पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत. यातील दोघे विद्यार्थी आहेत. एकाने ‘मिस यू नंबरकारी’, तर दुसर्याने ‘हम खडे तो सरकार पडे’ असे स्टेट्स ठेवले होते.
अंत्यसंस्कार पोलिसांच्या सूचनेप्रमाणेच
शाहरुखच्या अंत्यसंस्कारात कोणतीही गडबड किंवा विनाकारण शक्तिप्रदर्शन नको, असे पोलिसांनी बजावले होते. टोळीतील सदस्यांबरोबर नातेवाइकांनाही निरोप देण्यात आला होता. यामुळे त्याचा अंत्यसंस्कार निवडक 25 नातेवाइकांच्या उपस्थितीत झाला. मध्यंतरी एका गुंडाच्या अंत्यसंस्काराला सातारा रस्त्यावरून शेकडो तरुणांनी रॅली काढली होती. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी अगोदरच खबरदारी घेतल्याचे दिसून येते.