
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन…
‘मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करीत असताना तुम्ही मला मागील अनेक वर्षे पाहत आहात. त्या माध्यमातून मी बारामतीचा कायापालट केला आहे. बारामतीचा विकास हा राज्याला नव्हे, तर देशाला दिशा दाखवणार आहे.
असे असताना विरोधक सहकार मोडीत काढण्याचा माझ्यावर आरोप करीत आहेत.
तालुक्यातील खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ, बारामती सहकारी बँक आदी सहकारी संस्था अत्यंत नामांकित संस्था म्हणून ओळखल्या जातात. दुसरीकडे, सोमेश्वर साखर कारखाना राज्यात उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना ठरत आहे.
माळेगाव’ची देखील उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना, अशी ओळख आहे. त्यामुळे माळेगावचं भलं करण्याची धमक फक्त माझ्यात आहे,’ असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मळद (ता. बारामती) येथील प्रचार सभेत केले.
सध्या माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा आखाडा सुरू आहे. पवार म्हणाले की, बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. तालुक्याचे मूलभूत प्रश्न, त्यानुसार असलेल्या गरजा तसेच शिक्षणव्यवस्था, कालव्यावरील पूल आदी बाबींचा विचार करता मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्यात फिरत असताना मला अभिमान वाटतो की, बारामतीच्या जनतेने आठवेळा मला विधानसभेत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. माळेगाव कारखाना माझ्या आधिपत्याखाली मागील पाच वर्षांपासून काम करीत असताना वेळोवेळी सातत्याने उच्चांकी ऊसदर दिला आहे.
विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने केलेले आधुनिकीकरण दुरुस्त करून विक्रमी गाळप केले आहे.त्याचप्रमाणे इथेनॉल, वीज युनिट आदींचे विक्रमी उत्पादन घेत सभासदांना जास्तीचा ऊसदर दिला आहे.
त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना आपण बळी पडता कामा नये, असे आवाहन पवार यांनी केले. विरोधक म्हणतात की, माळेगाव कारखान्याची शिक्षण संस्था मी विद्या प्रतिष्ठानला जोडण्याचा प्रयत्न करीत आहे, हे साफ खोटे असून, विरोधक चुकीचा आरोप करतात.
माझ्याकडे मोठमोठ्या शिक्षण संस्था आहेत. माळेगाव कारखान्याची शिक्षण संस्था देखील अत्यंत नामांकित आहे. असे असताना मी का म्हणून ती शिक्षण संस्था विद्या प्रतिष्ठानला जोडीन? असा सवाल करीत विरोधकांनी चुकीचा आरोप करू नये, असे मत पवारांनी व्यक्त केले.
दरम्यान, विरोधक म्हणतात की, माळेगाव कारखान्यावर कर्ज झाले असून, कारखाना आर्थिक अडचणीत आहे. मात्र, मी आपल्याला सांगू इच्छितो की, माळेगाव कारखान्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. त्याचमुळे उत्कृष्ट आर्थिक नियोजनाचा पुरस्कार कारखान्याला मिळाला आहे.
बारामतीचा चेहरामोहरा बदलणारा आमदार म्हणून माझी ओळख आहे. हे आपल्या सर्वांच्या कृपेने करू शकतो. असे असताना माळेगाव कारखान्याचे खासगीकरण करण्याचे पाप मी करणार नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.
मी चेअरमन होणार आहे, तर विरोधकांच्या का पोटात दुखते ?
राज्याच्या मंत्रिमंडळात मी अनेक वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून काम करीत आहे. माझी कामाची पद्धत राज्याला माहीत आहे. असे असताना राज्यातील सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी, सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतो. माळेगाव कारखान्याच्या सभासदांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्या पाठिंब्यावर मी चेअरमन होत असताना विरोधकांच्या पोटात का दुखते? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला..