
सर्व यंत्रणांनी विकासकामे प्रस्तावित करून नियोजनबद्ध कार्यवाही करावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कामांचा नियमित आढावा घेतला जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
आगामी वर्षासाठी (सन 2025-26) गतवर्षीच्या तुलनेत 59 कोटी 28 लाखांची वाढ करून 632 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही यावेळी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक काल, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. या सभेला खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, रोहित पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती मुदतीत पूर्ण व्हावीत. स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वयाने विकास कामांचा चांगला आराखडा प्रस्तावित करावा. कामांच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2024-25 मध्ये मार्चअखेर 570 कोटी 41 लाख रुपये खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी 99.55 टक्के इतकी आहे, तर सन 2025-26 साठी गतवर्षीच्या तुलनेत 59 कोटी 28 लाखांची वाढ करून 632 कोटी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले.