
बडगुजर प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा टोला !
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर आता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, साधारणपणे दीड वर्षांपूर्वी भाजपा आमदार आणि विद्यमान मंत्री नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप थेट विधानसभेत केला होता.
यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपा आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
नाशकातील उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. पण ही कारवाई होण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजपामध्येच प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. पण त्यांच्या या प्रवेशाला नाशिक पश्चिम येथील आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केला आहे. तरीही, आज मंगळवारी बडगुजर आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत नितेश राणे यांच्यासह भाजपाला लक्ष्य केले आहे. सलीम कुत्ताच्या पार्टीतील बडगुजर यांच्यासारख्या पापी जिवात्म्यांचा हैदोस बघून भाचा नितेश राणे यांचे पित्त खवळले होते. यावर ’52कुळी’ उपाय म्हणून तत्परता दाखवत ‘सुधाकर’ला सुधारक ठरवण्याचा विडा हाती घेतला, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, बोले तो भिडू, यही भाजपा का हिंदुराष्ट्र है… कल को सलीम कुत्ता भी आकर मॅटर क्लोज कर सकता है…, अशी कोपरखळीही सुषमा अंधारे यांनी दिली आहे.