
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नेत्यांना आघाडी आणि युती धर्माचा विसर पडला आहे. सहकार क्षेत्राच्या निवडणुकीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. त्यामुळे नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगीला सुरुवात झाली आहे.
आमदार परिणय फुके यांनी भंडाराचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना तुम्ही आमच्यामुळे निवडून आले, असे सांगून त्यांना कडक इशारा दिला आहे.
भाजपने सहकार क्षेत्रात लक्ष घालून निवडणूक लढणे सुरू केले आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागल्याची टीका आमदार फुके यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे पद दिल्याने नरेंद्र भोंडेकर यांना काहीतरी परफॉर्म करून दाखवायचा आहे. यासाठी ते महायुतीच्या नेत्यांसोबत फटकून वागत आहेत आणि परंपरागत विरोधक नाना पटोले यांच्यासोबत हातमिळवणी करीत आहे, असा दावाही फुकेंनी केला.
विधानसभेच्या निवडणुकीत भोंडेकर कोणाच्या भरवशावर निवडून आले, कोणामुळे आमदार झाले हे त्यांनी लक्षात ठेवावे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी मदत केली. याचा विसर त्यांना पडला का, अशा शब्दांत परिणय फुके यांनी भोंडेकर यांना सुनावले.
कार्यकर्ते या नाही तर त्या पक्षात जातच असतात. भाजपमध्येही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रवेश करीत आहे. आम्ही त्यांना पक्षातून निलंबित केले, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, असे सांगून फुके यांनी भोंडेकर यांनी फार मोठी कामगिरी केली नसल्याचे सांगितले.
निलंबित केलेल्या कार्यकर्त्यांनी कुठे जावे, हा त्यांचा प्रश्न आहे. कुठल्याही पक्षात जाण्यास त्यांना स्वातंत्र्य आहे. भाजप देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पक्ष मोठा होत असल्याने नवीन लोक भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे काँग्रेस व इतर पक्षात नैराश्य आहे. त्यांना काँग्रेसमध्ये भवितव्य दिसत नसल्याने ते भाजपात येत आहेत. त्यांचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे असेही फुके म्हणाले.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत नाना पटोले यांच्या पराभवासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण ताकद लावली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भाजपने उमेदवार केले होते. येथे अतिशय चुरशीची लढत झाली होती. नाना पटोले यांचा पराभव निश्चित झाला होता. मात्र टपाली मतांनी नाना पटोले यांना तारले. त्यापूर्वीच्या निवडणुकीत पटोले यांच्या विरोधात फुके लढले होते. ही निवडणूक त्यावेळी चांगलीच गाजली होती.