
इम्तियाज जलीलांचा नागपूर घेऊन जाण्याचा सल्ला अन् फडणवीस भडकले…
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहाराची रेंगळलेल्या पाणी पुरवठा योजनेवरून ‘AIMIM’चे इम्तियाज जलील यांनी भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं.
औरंगाबादच्या (छत्रपती संभाजीनगर) पाणी पुरवठा योजनेमागील किस्सा सांगितला.
ही योजना नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला दिल्यावर, तत्कालीन आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिडले आणि तेव्हापासून ही पाणी योजना रेंगळाल्याचे ‘सरकारनामा’ डिजिटिलशी बोलताना सांगून खळबळ उडवून दिली.
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहरातील पाणी प्रश्नावर बोलताना इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी रेंगाळलेल्या पाणी योजनेमागील किस्सा सांगितला. ते म्हणाले, “ही पाणी योजना 700 कोटी रुपयांची होती. आता 2025 चालू आहे. ही स्किम 3 हजार 200 कोटी रुपयापर्यंत गेली आहे. तरी स्किम पूर्ण झालेली नाही”. पैठणच्या जायकवाडीपासून ते औरंगाबादपर्यंत 50 किलोमीटरपर्यंत, ही पाण्याची लाईन टाकायची होती. यात काय राॅकेट सायन्स आहे?, असा सवाल केला.
या 700 कोटींच्या स्किममध्ये जास्तीजास्त 30 टक्क्यापर्यंत बजेट वाढू शकतो. पण हे सगळे नेते टक्केवारी घेणारे आहेत. हे का बोलतो मी, या शहराला 15 वर्षे अगोदरच पाणी मिळायला पाहिजे होते. या पाण्यासाठी एक समांतर नावाची कंपनी आणायची होती. कोणाची कंपनी होती, ती अमित शाह यांच्या जवळचे, भाजपचे (BJP)राज्यसभा सदस्य सुभाषचंद्र गोयल यांची ही कंपनी होती’, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
आयएएस ऑफिसर घरी येऊन बसायचे
‘देशात एकमेव, असा प्रयोग होणार होता की, पाण्याचा ठेका दिला जाणार होता. तो ठेका कोण घेणार होते, तर सुभाषचंद्र गोयल! भाजप, शिवसेना सर्व आमदार यात सहभागी झाले होते. सर्वांचा 20 वर्षांसाठी टक्का ‘फिक्स’ झाला होता, असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी केला. या सर्वांविरोधात मी होतो. मी माझ्या मुद्यावर ठाम होती की, अशी महागडी स्किम शहराला लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. यानंतर खूप दबाव आणला गेला. यासाठी आयएएस ऑफिसर घरी येऊन बसले होते, अशी गौप्यसफोट इम्तियाज जलील यांनी केला.
फडणवीस चिडले अन्…
यानंतर देवेंद्र फडणवीससाहेबांनी मंत्रालयामध्ये एक बैठक काॅल केली होती. सुटा-बुटातले अधिकारी होते, सगळे आमदार होते. संजय शिरसाट आमदार होते. आम्हाला पाणी पाहिजे, सर्व हो करत होते. पण, योजना एवढी चांगली असेल, तर सुरूवातीला नागपूरला घेऊन जा, अशी भूमिका मी घेतली. त्या बैठकीत माझ्यावर देवेंद्र फडणवीस चिडले, फाईल्स उचलली, आता बघतोच, एवढंच म्हणाले. त्यांच्या बोलण्याचा टोन हा औरंगाबादला (छत्रपती संभाजीनगर) पुढचे दहा-वीसपर्यंत कसं पाणी मिळतं हेच पाहू, असा होता, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.
चोरांना काय घाबरायचं….
या पाणी योजनेत असं काय राॅकेट सायन्स आहे की, सरकारचे जीवनप्राधिकरण करू शकत नाही, ती एक खासगी कंपनी करेल. मी माझा विरोध कायम ठेवला. मला आर्थिक अमिष दाखवून विकत घेण्याचा प्रयत्न केला. निरोप आले. पंगा घेऊ नका. पण चोरांना काय घाबरायचं, असं म्हणत भूमिकेवर ठाम राहिलो, आणि त्याचा मला अभिमान आहे, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले. 2014 मागणी केली होती की, हे काम जीवन प्राधिकरणाला द्या, ते 2018मध्ये दिलं गेलं. पण आजपर्यंत ही योजना झाली नसल्याची खंत व्यक्त करताच, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले.