
शरद पवारांनी सांगितला सोडून जाणाऱ्यांचा इतिहास !
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनिकरणाबाबत चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जे गेले आहेत त्यांची चिंता करू नका, असं सांगितलं आहे.
तसंच सत्तेसाठी भाजपसोबत जाण्याचं संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला मान्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाबाबतच्या चर्चांना शरद पवार यांनी पूर्णविराम दिला असल्याचं आता बोललं जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी आतापर्यंत आपल्याला सोडून गेलेल्यांचं काय झालं, याबाबतचा इतिहास देखील उलगडून सांगितला आहे.
पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची सत्ता आणण्यासाठी संघटन मजबूत करण्याचं काम करणे आवश्यक आहे. सध्या परिस्थिती पाहिली तर काही लोक पक्ष सोडून गेले आहेत. तर काही लोक पक्षामध्ये येत आहेत. मात्र जे गेले आहेत, त्याबाबत चिंता करू नका. माझ्या आयुष्यात अनेकदा अशा गोष्टी घडल्या असल्याचं शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, मला आठवतं 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यानंतर 1980 साली आमचं सरकार बरखास्त करण्यात आले. सरकार बरखास्त झाल्यानंतर निवडणुका लागल्या. या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाचे 70 आमदार निवडून आले. दोन महिन्यानंतर मी इंग्लंडला दहा दिवसांसाठी गेलो. तिकडे असताना इकडे एक चमत्कार झाला. 70 पैकी 6 आमदार सोडून बाकी सर्वांनी पक्ष सोडला. या गोष्टीचे मला फार मोठं आश्चर्य वाटलं. कारण लोकांनी पाठिंबा दिला, कार्यकर्त्यांनी कष्ट केलं आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले.
एवढं झाल्यानंतर देखील मी चिंताग्रस्त झालो नाही. पुन्हा लक्ष घातलं, लोकांशी संपर्क वाढवला. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक झाली आणि जे सोडून गेले होते, त्यापैकी 90 टक्के लोकांचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा आमच्या पक्षाचे 71 लोक निवडून आले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा पक्ष हा एक महत्त्वाचा पक्ष बनला, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.
कोण आलं, कोण गेलं याचा अजिबात विचार करू नका. लोक हुशार आहेत, ते योग्य निर्णय घेतील. गांधी, नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांचा तसेच फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार ज्यांना मान्य आहे. त्यांना सोबत घेऊ. मात्र सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचं, ही भूमिका जर कोणी मांडत असेल तर तो विचार काँग्रेसचा नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा, मात्र भाजपशी संबंध हा काँग्रेस विचार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे संधीसाधूपणाचे राजकारण आम्हाला मान्य नाही, असं शरद पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी आपली आहे. मात्र जर कोणी एका विचाराने आणि कार्यक्रमाने सोबत येत असेल तर त्यांना सोबत घेऊ. मात्र, जास्तीत जास्त तरुणांना आणि भगिनींना संधी देऊन एक नवीन नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करू, असंही पवारांनी स्पष्ट केले.