
पिंपरी-चिंचवड शहराच्या आजुबाजूला अनधिकृत बांधकामे झाली आहेत. नाईलाइजाने गुंठेवारीमध्ये छोटी, मोठी घरे बांधून काही लोकांनी निवारा निर्माण केला. आता ही अनधिकृत बांधकामे कायम करण्याची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही.
अनधिकृत बांधकामे नियमित करावीत. नवीन अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नयेत,’ अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ताथडवेतील संकल्प मेळाव्यात पवार बोलत होते.
‘मुंबईनंतर पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कारखानदारीचे जाळे विस्तारले. शहर वाढले असून, चित्र बदलले आहे. शहरातील राजकारण, समाजकारण यात लक्ष घालण्याची गरज आहे. अनेक वर्षे हा परिसर आमच्या विचारांचा होता. पिंपरी-चिंचवडचा चेहरा बदलण्यासाठी अनेकांनी खस्ता खालल्या आहेत. यामागे गांधी, नेहरू, काँग्रेसच्या विचाराने शहरात काम केले. ही विकासाची गाडी पुढे गतीने घेऊन जायचे आहे,’ असेही ते म्हणाले.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘लोकनियुक्त पदाधिकारी नसताना महापालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध केला. नगरसेवक, बांधकाम व्यावसायिकांच्या जागांवर आरक्षणे पडली नाहीत. सर्वसामान्य लोकांच्या जागांवर आरक्षणे टाकली आहेत. निळी पूररेषा कोणाच्या हितासाठी वळविली. स्मार्ट सिटीत १५०० कोटी रुपयांचा निधी आला. नद्यांमध्ये ३० टक्के मैलामिश्रित पाणी सोडले जाते. मग, निधीचे काय केले. कुदळवाडीत किती बांगलादेशी, रोहिंगे सापडले हे पोलिसांनी सांगावे.’
शहर कार्यकारिणी बदलण्याची मागणी
शहर कार्यकारिणी बदलावी, अशी भूमिका शहराध्यक्ष कामठे यांनी घेतली. शहराला आमदार रोहित पवार यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करावी. कार्यकर्त्यांना बळ मिळेल. पक्षात लोकशाही नाही. अंतर्गत विरोधकांना बोलू दिले जात नाही. संघटनेत बदल झाला पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्याकडे शहराची धुरा द्यावी, अशी मागणी देवेंद्र तायडे यांनी केली. महापालिका निवडणूक आघाडीने लढवावी. पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नाही. महापालिका निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे संदीप चव्हाण यांनी म्हटले.