
देशात केवळ तीन राज्यांत एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेससमोरील संकटं कमी होताना दिसत नाहीत. सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशातील सरकार कोसळण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्यांचा लेक त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. त्याने आपले वडील मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची पोस्ट सोशल मीडियात केली अन् एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या सरकारमधील ज्येष्ठ नेते आणि पशुपालन मंत्री चंद्र कुमार हे कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची चर्चा आहे. त्यांचे पुत्र नीरज भारती यांनीच फेसबुकवर याबाबत पोस्ट करत दावा केला होता. नीरज हे माजी आमदार आहेत. त्यांनी बुधवारी केलेल्या पोस्टमध्ये आपले वडील गुरूवारी राजीनामा देणार असल्याचा दावा केला होता.
पक्षामध्ये दलालांची कामे होत असतील मंत्री राहून काय उपयोग, असा गंभीर आरोप नीरज यांनी पोस्टमध्ये केला होता. काही तासांनी त्यांनी पुन्हा एक पोस्ट करत चौधरी साहेबांना आश्वासन मिळाले असून ते मुख्यमंत्र्यांना भेटून बोलतील, असे माहिती दिली. त्यामुळे आज चंद्र कुमार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होऊन त्यातून तोडगा निघणार का, याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
एकीकडे नीरज हे मोठा दावा करत असताना त्यांचे मंत्री असलेले वडील बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत शिमला येथे होते. त्याचदिवशी नीरज यांनी केलेल्या पोस्टमध्ये काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. चंद्र कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षावर सडकून टीका केली होती. हिमाचल प्रदेशातील काँग्रेसला लकवा झाला आहे, असे म्हणत त्यांनी संघटनेवर आसूड ओढले होते.
85 वर्षांचे चंद्र कुमार हे काँग्रेस सरकारमधील सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. ज्वाली या मतदारसंघाचे ते नेतृत्व करतात. त्यांनी या मतदारसंघातून नऊवेळा निवडणूक लढली असून सहावेळी विजयी झाले आहेत. ते एक टर्म लोकसभेचे खासदारही होते. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवरून आता चर्चांना उधाण आले आहे.