
शरद पवार यांचा नाव न घेता अजित पवारांना टोला !
मी महाराष्ट्रात सहकारी संस्थांमध्ये आजपर्यंत कोणतेही पद घेतले नाही. पद हे इतरांना द्यायचे असते, इतरांना मोठे करायचे असते. मीच पद घ्यायला लागलो तर काय होईल. संधी द्यायची ही भूमिका मी सातत्याने घेतली आहे.
मी स्वतःसाठी कधी काही मागितले नाही, त्याची काही आवश्यकताही नव्हती, या शब्दांत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
माळेगाव कारखान्याबाबत ते म्हणाले की, तालुक्यातील हा पहिला कारखाना आहे. तुम्ही लोकांनी मला 1967 पासून निवडून दिले आहे. गेली 58 वर्षे एक माणूस कधीही पराभव न घेता सतत निवडून येतो, असे दुसरे उदाहरण देशात नाही.
या कालावधीत राज्य, देश आणि स्थानिक पातळीवर अनेक संस्थांशी माझा संबंध आला. सहकारी संस्था ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा आहे. अनेक लोक ममाळेगावफचे चेअरमन झाले. तिथे कधी आम्ही राजकारण आणले नाही. मागे रंजन तावरे व त्यांच्या सहकार्यांचे पॅनेल विजय झाले होते, तरी त्यांना मदत करणे हाच माझा दृष्टिकोन होता.
गेली 40 वर्षे ज्या वेळी सहकारी संस्थांत, साखर धंद्यात प्रश्न निर्माण होतात, त्याचा अंतिम निर्णय मी घ्यावा, असे सूत्रच सगळ्या कारखान्यांनी ठरविले आहे. मी शेती खात्याचा मंत्री होतो. सहकाराचाच ते खाते एक भाग असते. देशातील सर्व कारखाने माझ्या खात्यांतर्गत होते. मी त्याद्वारे शेतकरीहित पाहिले. कारखान्यांना मदत केली.
‘माळेगाव’लाही मी मदत केली. कोण कोणत्या पक्षाचा आहे, हे मी पाहिले नाही. ‘माळेगाव’ने मागे वार्षिक सभेत शिक्षणासंबंधी निर्णय घेतला. संस्था उभी केली आणि मला अध्यक्ष केले. त्यातून शिक्षणाचे मोठे केंद्र निर्माण झाले. शेतकर्यांनी संस्थेला मदत केली.
सभागृहासाठी मी मदत केली. मुलींच्या व्यायामशाळेसाठी पैसे दिले. खा. सुळे यांनी मुलींचे अडीच कोटींचे वसतिगृह बांधले. 2024 ला केशवराव जगताप यांच्या हातात मी तीन कोटींचा चेक दिला. काही रकमा उभ्या केल्या. त्यामुळे शिक्षणाचे दालन इथे निर्माण झाले.
आता ‘माळेगाव’मध्ये 300 इंजिनिअर आहेत. त्यात 25 टक्के मुली आहेत. माझ्या भागातील मुले मला देश-विदेशात भेटतात. सिंहगड शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मी आहे. तिथे काही हजार मुले-मुली शिकतात. शारदानगरला काही हजार मुली शकतात. विद्या प्रतिष्ठानमध्ये 35 हजार मुले-मुली शिकतात. सोमेश्वर कारखाना परिसरात देखील शिक्षणाची दालने उभी केली.
सत्तेच्या गैरवापराची भीती
‘माळेगाव’च्या निवडणुकीत काही लोक सत्तेचा गैरवापर करतील, काही लोक आणखी काही देणेघेणे करतील, कोणाला काय करायचे ते करावे, आपण स्वच्छ निवडणूक करायची. आपले जे मत आहे, आपल्याला जो अधिकार आहे, तो कोणाला विकायचा नाही, असे शरद पवार म्हणाले.