
मेळाव्यात बाप-लेकाचा उर भरून आला…
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. बाप-लेकानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
याच मेळाव्यात श्रीकांत शिंदेंना एक नवं नाव मिळाल्याचा उलगडाही झाला.
खासदार शिंदे यांच्यासह मिलिंद देवरा हे दोन शिवसेनेचे खासदार केंद्र सरकारने परदेशात पाठवलेल्या दोन शिष्टमंडळांमध्ये होते. ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारने जगभरात विविध शिष्टमंडळे पाठविली होती. यापार्श्वभूमीवर दोन्ही खासदारांची मेळाव्यामध्ये मुलाखत घेण्यात आली. यावेळी श्रीकांत शिंदेंना नवं नाव मिळाल्याचा किस्सा समोर आला.
मुलाखतीमध्ये बोलताना श्रीकांत शिंदेंनी सांगितलं की, मोदींसोबतचा माझा फोटो समोर आल्यानंतर मला खूप लोकांनी विचारलं की मोदीजी काय म्हणाले. एकतर मोदीजी सर्व शिष्टमंडळावर समाधानी होते. सर्वपक्षीय लोकांनी देशाची बाजू चांगल्याप्रकारे मांडली, त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. ते पंतप्रधान आहेत. त्यांना सर्व गोष्टी माहिती असतात. त्यांचं लक्ष या दौऱ्यावर चांगल्याप्रकारे होतं. ते जवळून पाहत होते.
आमच्या शिष्टमंडळामध्ये मला भाऊ म्हणत होते. पंतप्रधान मला ज्यादिवशी भेटले, त्यावेळी ते मला म्हणाले, श्रीकांतभाई आता तुम्ही भाऊ झाला. चांगले काम केलंत. आपल्या पंतप्रधानांचे बारीक लक्ष होतं. एवढे सेन्सेटिव्ह पंतप्रधान आपल्याला यापूर्वी कधी मिळाले नव्हते, असे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी मुलाखतीत सांगितले.
हाच धागा पकडून एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणात मोदींनी श्रीकांत शिंदे यांना भाऊ असं नाव दिल्याचे सांगितले. दोन्ही खासदारांनी केलेल्या कामामुळे माझा उर अभिमानाने भरून आला. शिवसेनेचे दोन खासदार जगभरात देशाचे नेतृत्व करतात. मोदींनीही श्रीकांतच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यांनी श्रीकांतला नवं नाव दिलंय, भाऊ! हे श्रीकांतचं श्रेय नाही, सर्व शिवसैनिकांचे आहे, असे शिंदे यांनी सांगितले.