
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण आज त्यांचा स्टेजवरच रडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
राष्ट्रपती मुर्मू आजपासून तीन दिवसांसाठी उत्तराखंडची राजधानी डेराडूनच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळी येथील राष्ट्रीय दृष्टी दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेमध्ये त्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला. संस्थेतील विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. खास राष्ट्रपतींसाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम सुरू झाल्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुमधूर गीते सादर केली. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. मुलांनी ‘बार-बार ये दिन आए’ हे गाणं गायलं. मुलांच्या आवाजातील हे गाणं ऐकून राष्ट्रपती प्रचंड भावूक झाल्या. त्या स्टेजवरच रडू लागल्या. स्टेजवरील त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रुमाल दिला. गाणं सुरू असताना बराचवेळी त्यांनी रुमाल डोळ्यालाच लावून ठेवला होता.
राष्ट्रपतींचा हा भावूक झालेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांच्याही भावून प्रतिक्रिया उमटत आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांमुळे राष्ट्रपतींच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यामुळे हा कार्यक्रम त्यांच्या स्मरणात राहील. यानंतर भाषणादरम्यान राष्ट्रपतींना दिव्यांगांसाठी केवळ सरकारच नव्हे तर समाजानेही पुढे येऊन काम करायला हवे, असे आवाहन केले.
दरम्यान, राष्ट्रपतींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, त्यांचे जीवन आणि नेतृत्व देशातील कोट्यवधी लोकांना प्रेरित करत राहील. जनसेवा, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाविषयी त्यांची अतुट प्रतिबध्दता सर्वांसाठीच आशा आणि शक्तीचा किरण आहे. त्यांनी नेहमीच गरीब आणि वंचितांना सशक्त बनविण्याचे काम केले.