
ठाकरेंना डिवचणारे ‘एकनाथ शिंदेही’ आता पुत्र प्रेमात आंधळे ?
घराणेशाही हे भारतीय राजकारणाचे वास्तव आहे. कुणी कितीही नाकाने कांदे सोलत असले तरी कोणताही पक्ष घराणेशाहीला अपवाद राहिलेला नाही. उद्धव ठाकरे हे पुत्र आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित होते, उद्धव ठाकरे यांना पुत्राचीच चिंता आहे, असे आरोप झाले, टीकाही झाली.
अशी टीका करणाऱ्यांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. ठाकरे पिता-पुत्रांवर टीका करण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अग्रेसर असतात, अदित्य यांचा उल्लेख राजपुत्र असा करून त्यांना डिवचतात, चिडवतात.
काल शिवसेनेचा वर्धानपनदिन सोहळा शिंदे आणि ठाकरे यांनी साजरा केला, अर्थात वेगवेगळा. पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कौतुक करताना या सोहळ्यात एकनाथ शिंदे भावूक झाले होते. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या मिलिंद देवरा यांचेही एकनाथ शिंदे यांनी तोंडभरून कौतुक केले. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप वाढला होता, असा आरोप मंत्री भरत गोगावले यांनी नुकताच केला आहे. आता ते ज्या शिवसेनेत आहे तेथे काय सुरू आहे? खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उदय झाला आहे. पक्षाचे बहुतांश निर्णय तेच घेत आहेत. घराणेशाही मागच्या नव्हे पुढच्या दाराने आली आहे.
या कार्यक्रमात मुलाचे कौतुक करून एकनाथ शिंदे यांनी पक्षसंघटनेला संदेश दिला आहे. घराणेशाही सुरू झाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर परदेशांत गेलेल्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार शिंदे यांनी केले होते. कौतुक करण्याठी एकनाथ शिंदे यांनी हा धागा पकडला. या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार शिंदे यांना शाबासकी दिली आहे, हेही सांगायला ते विसरले नाहीत. खासदार शिंदे आणि देवरा यांचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री शिंदे थकत नसल्याचे दिसून आले. मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे, नेतृत्व खासदार शिंदे करतील. मिलिंद देवरा यांची भूमिकाही महत्वाची राहील, असा संदेश याद्वारे त्यांनी दिला आहे.
मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेच्या कालच्या मेळाव्यावर केलेली टीका बोलकी आहे. “मी आणि माझा बबड्या, मेळावा संपला…!” अशा मोजक्या शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या या कार्यक्रमाचे वर्णन केले आहे. शिवसेना पक्षसंघटनेचे महत्वाचे सर्व निर्णय खासदार शिंदे हेच घेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यानंतर खासदार शिंदे हेच शिवसेनेचे नेते आहेत, हे एव्हाना स्पष्ट झालेले आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे वाटप करतानाही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे खासदार शिंदे यांचे संघटनेत महत्व वाढले आहे. त्यांचा शब्द पक्षसंघटनेत अंतिम ठरेल, ती वेळही लवकरच येऊ शकते.
हाच मुद्दा आहे, ज्यावरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर निशाणा अद्यापही साधत असतात. ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या नेत्यांना आता मुंबई महापालिकेची निवडणूक एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवावी लागणार आहे. आतापर्यंत पडद्यामागे राहून खासदार शिंदे जे करत होते, ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उघडपणे करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. त्यासाठीची जोरदार पूर्वतयारी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात केली आहे.पुत्रप्रेमावरून उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचे काय? असा प्रश्न त्यांना विचारण्याचे धाडस पक्षातून कुणीही दाखवणार नाही.
किती आमदार, खासदार निवडून आले, सत्ता, पदे मिळाली का? ही राजकारणातील यशाची मोजपट्टी समजली जाते. या पातळीवर शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांना विधानसबा निवडणुकीत मतदारांनी कौल दिला आहे. त्यामुळेच मी एक सरकार पाडले, असे एकनाथ शिंदे अभिमानाने बोलू शकतात. कालच्या मेळाव्यातही ते तसे बोललेच. शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींची राज्याच्या राजकीय इतिहासात नोंद होणार आहे. शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली, याचे उत्तर सर्वांना माहित आहे. असे असले तरी लोकांनी त्यांचे अधिक आमदार निवडून दिले आहेत. त्यामुळे त्यांची बाजू भक्कम आहे.
घराणेशाहीपाससून कोणत्याही पक्षाची सुटका झालेली नाही. शिवसेनेचीही होणार नव्हती. एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पक्षात सर्वाधिक शक्तिशाली आहेत, हे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. आदित्य ठाकरे यांचा प्रभाव वाढत आहे म्हणून उद्धव ठाकरे यांना सोडणाऱ्या नेत्यांना आता श्रीकांत शिंदे यांचे नेतृत्व मान्य करावे लागणार आहे. घराणेशाहीला विरोध हा केवळ सोयीसाठी असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. श्रीकांत शिंदे यांनी घेतलेले निर्णय एकनाथ शिंदे यांनाही मान्य करावे लागणार आहेत. त्यामुळे अन्य नेत्यांना कोणताही पर्याय राहणार नाही. हे काही नवीन नाही किंवा पहिल्यांदाच होत आहे, असेही नाही. मुद्दा असा की, शिंदे आता आपल्या पुत्रालाही राजपुत्र वगैरे म्हणणार आहेत का?