
माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रराव तावरे; रंजन तावरे यांची घोषणा…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना आव्हान केले होते की, माझ्या पॅनेलच्या चेअरमनपदाचा दावेदार मी स्वतः आहे, तुम्ही तुमच्या पॅनेलच्या चेअरमनपदाचे नाव जाहीर करावे.
या आव्हानाला प्रतिसाद देत सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे रंजन तावरे यांनी आमचे चेअरमन जे यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे चालवत आहेत ते सहकारमहर्षी चंद्रराव (आण्णा) तावरे असतील, असे जाहीर करताच उपस्थित सभासदांनी एकच जल्लोष केला. कारखाना निवडणूक प्रचारानिमित्त तावरे बोलत होते.
दरम्यान त्यापूर्वी आपल्या मार्गदर्शनात सहकारमहर्षी चंद्रराव तावरे म्हणाले, माळेगाव साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर चालणारा कारखाना आहे. या कारखान्याचा ऊस दर राज्याला दिशा देणारा ठरतो. कारखान्याच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी ऊस उत्पादक सभासदांना जास्तीचा ऊस दर दिला आहे. त्यामुळे खासगी साखर कारखानदारांना याचा फटका बसतो.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळपास 12 ते 13 खासगी कारखाने आहेत, जे इतरांचे नावे दाखवलेले आहेत. त्या कारखान्यांचे जवळपास 1 कोटी मे. टन उसाचे गाळप केले जाते. अशावेळी जर आम्ही सहकारी कारखानदारीच्या माध्यमातून खासगी साखर कारखान्यांपेक्षा 400 ते 500 रुपये टनाला जास्त दिले तर अजित पवारांना निदान टनाला 100 ते 200 रुपये जास्त द्यावे लागतील. म्हणजेच त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते.
अजित पवारांचं खरं दुखणं इथं आहे. त्यामुळे माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून त्यांना सहकार मोडीत काढायचा असून, आपले नुकसान टाळायचे आहे, असा आरोप सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला. तावरे म्हणाले, माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील हजारो ऊस उत्पादक शेतकर्यांच्या भल्यासाठी आजपर्यंत आम्ही झटत आलो आहे.
शेतकरी सभासदांच्या स्वाभिमानासाठी आम्ही कारखान्याची निवडणूक लढत आहोत. विरोधक मात्र केवळ स्वार्थी वृत्ती ठेवून कारखाना निवडणुकीकडे पाहात आहेत. कारखान्याच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत अनेक उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभे केले. त्यामुळे सभासदांना अधिकचे चार पैसे देता आले. शिक्षण संस्था उभी केली.
शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सभासदांची मुलं-मुली उच्च पदवी प्राप्त करून देशासह परराज्यात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. अशावेळी कार्यक्षेत्रातील छोट्या-मोठ्या शेतकर्यांना, त्यांच्या कुटुंबांना आधार मिळू लागला, ती कुटुंबे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वाभिमानाने जगू लागली, यासाठी आम्ही प्रयत्न केला.
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यात मागील अनेक वर्षे छत्रपती साखर कारखाना होता. त्याची काय अवस्था त्यांनी केली हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे माळेगावची तशी अवस्था होऊ नये यासाठी आमची लढाई चालू आहे. माळेगाव कारखान्यावर हजारो ऊस उत्पादक शेतकर्यांचे प्रपंच अवलंबून आहेत. अशावेळी जर कारखाना कर्जबाजारी होऊन मोडकळीस आला तर त्यावर अवलंबून असणारी हजारो कुटुंबे देशोधडीला लागतील. त्यांचा प्रपंच वाचावा, तो सुधारावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आलो आहे.
विरोधक चुकीचे आरोप करतात
आमच्या काळात विजेचे आणि इथेनॉलचे कमी उत्पादन निघाले असा आरोप विरोधक करतात, तो साफ चुकीचा आहे. कारण आमच्या ताब्यात कारखाना असताना 21 मेगावॉट क्षमतेने विजेचे उत्पादन होत होते. त्यावेळी दोन बॉयलर आणि दोन टर्बाईन सुरू होते. आम्ही कारखाना विस्तारीकरणाच्या दरम्यान तिसरा बॉयलर, तिसरे टर्बाइन बसवण्याच्या तयारीत असताना आमच्या ताब्यातून कारखाना गेला.
त्यामुळे तीन बॉयलर आणि तीन टर्बाईन यांच्या माध्यमातून त्यांच्या काळात विजेचे 35 मेगावॉट क्षमतेने उत्पादन निघाले. दुसरीकडे पूर्वी सी हेव्हीपासून इथेनॉलची निर्मिती होत होती. नंतर 2019-20 मध्ये शासनाचे बी हेवी टू इथेनॉल आणि सिरप टू इथेनॉल हे धोरण आले. त्यामुळे विरोधकांच्या ताब्यात कारखाना गेल्यानंतर त्यांनी या धोरणानुसार अधिकची इथेनॉल निर्मिती केली. त्यामुळे आमच्या काळात वीज आणि इथेनॉल यांचे उत्पादन कमी निघाले हा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचे चंद्रराव तावरे यांनी सांगितले.
– रंजन तावरे, माजी अध्यक्ष, माळेगाव साखर कारखानाउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव साखर कारखाना निवडणूक स्वतःच्या स्वार्थासाठी प्रतिष्ठेची केली आहे. त्यांनी राज्याचा उपमुख्यमंत्री असताना स्वतः चेअरमन होणार असे जाहीर केले आहे. यासाठी ते सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांचा सभासदांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे; मात्र माळेगावचा सभासद स्वाभिमानी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय ते राहणार नाहीत.