
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मराठा माणूस एकत्र येऊ नये म्हणून मालकाचा नोकर हाॅटेलमध्ये गाठीभेटी घेत असल्याचे ठाकरे म्हणाले होते.
त्यावर माध्यमांनी फडणवीस यांनी विचारले असता त्यांनी बोलणे टाळले. मात्र, उद्धव ठाकरेंसाठी ‘बोल बच्चन’ हा शब्द वापरला. आता याच एका शब्दावरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली.
संजय राऊत म्हणाले, ते (फडणवीस) आम्हाला बोलबच्चन म्हणत असतील तर ती प्रेरणा मोदींकडूनच घेतली आहे. ते जगातील बोलबच्चन मंडळाचे अध्यक्ष आहेत.तर, देवेंद्र फडणवीस हे ज्युनिअर बोलबच्चन आहेत. त्यांना अजून ते जमत नाही ते उघड पडतात, असा टोलाही राऊत यांना लगावला.
संजय राऊत म्हणाले, पूर्वी आम्ही त्यांच्यासोबत (भाजप) काम करत होते. नरेंद्र मोदी हे जगातील समस्त बोलबच्चन मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे पूर्वी आमचे त्यांच्याशी संबंध असल्याने त्यांच्यातील काही गुण आमच्यात आले असतील. मोदी बोलबच्चन असले तरी भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली होती तेव्हा मात्र त्यांची दातखीळ बसली होती, असा पलटवार देखील राऊत यांनी केला.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ?
मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सभेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला होता.