
भाजपने गेल्या पंचवीस वर्षांत राज्यातील अनेक बड्या नेत्यांना पक्षात घेतले; मात्र सांगलीच्या वसंतदादा घराण्यातील नेत्यांना वश करणे त्यांना जमले नव्हते. मात्र वसंतदादांच्या नातसून असलेल्या जयश्री मदन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय हा दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का देणारा ठरला आहे.
या खेळीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पालकमंत्रिपदाच्या दुसऱ्या ‘टर्म’मध्ये सांगलीच्या स्थानिक राजकारणात आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसला आणि युतीतील अजितदादा गटासह जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीलाही मोठा शह दिला आहे.
दक्षिण महाराष्ट्रात भाजपचा चंचुप्रवेश ते आता एक बलाढ्य पक्ष असा प्रवास जेमतेम २५ वर्षांतील आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या वसंतदादा पाटील यांच्यामुळे हा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला होता. सोनिया गांधी यांच्या परदेशी मुळाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली तेव्हा सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पहिल्यांदा दुभंगली. काँग्रेसची एक हाती ताकद इथूनच कमी होऊ लागली.
कारण पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यावेळी आर. आर. पाटील, जयंत पाटील या दिग्गजांबरोबर त्यावेळेचे वसंतदादांचे पुतणे विष्णूअण्णा पाटील देखील सामील झाले होते. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू पाटील आणि त्यांचे पुतणे विष्णूअण्णा पाटील हा दादा घराण्यातील अंतर्गत संघर्ष देखील पाहायला मिळालेला आहे.
अर्थात विष्णूअण्णा यांचे पुत्र मदन पाटील यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून २००४ मध्ये विधानसभेला बंडखोरी केली आणि त्यानंतर ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले. म्हणजेच पुन्हा मूळ काँग्रेसच्या प्रवाहात आले. मदन पाटील यांच्या बंडखोरीमुळे महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी शून्य झाली होती. तिला पुन्हा बळ मिळवण्यासाठी नंतरच्या काळात जयंत पाटील यांनी २००८ मध्ये सर्वपक्षीय महाआघाडी स्थापन करून महापालिकेची सत्ता मदन पाटील यांच्या हातून काढून घेतली होती.
जयंत पाटलांनी जी युती केली त्यात भाजपचे तत्कालीन दिग्गज नेते संभाजी पवार यांचा सिंहाचा वाटा होता. सर्व पक्ष मदन पाटील यांच्या विरोधात एकत्र आल्याने आणि त्यांच्याकडील नगरसेवकांत एक सोनेरी टोळी तयार झाल्याने त्यांचा महापालिकेच्या राजकारणात पराभव झाला होता.
खरे तर एक काळ काँग्रेसला संपवण्यासाठी जयंत पाटील यांचे भाजपसह अन्यविरोधकांशी थेट कनेक्शन होते. पण सुरुवातीपासून मदन पाटील यांची नगरपालिका आणि त्यानंतर झालेल्या महापालिकेवर एकहाती कमांड होती. सर्वाधिक नगरसेवक मदन पाटील यांचे होते. त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी त्यावेळी राष्ट्रवादी, भाजप, शेकाप, जनता दल, डावी आघाडी या सर्वांना एकत्र यावं लागलं होतं.
अर्थात पुढे मदन पाटील यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांच्या केडरचा राजकारणावरील प्रभाव अलीकडच्या काळात कमी झाला होता. अर्थात दुसऱ्या बाजूला मूळ वसंतदादा घराण्यातून सुद्धा बंडखोरी करून विशाल पाटील यांनी लोकसभेला आपली ताकद दाखवून दिली.
हा येथील राजकारणाचा संक्षिप्त इतिहास पाहिला तर मदनभाऊ यांच्या जाण्यानंतर देखील महापालिका क्षेत्रातील त्यांचं केडर हे महत्त्वपूर्ण टिकून राहिलं आहे. याच जोरावरती त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी विधानसभेला काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. मात्र यामध्ये त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बाजी मारली, आणि जयश्री पाटील यांना डावलण्यात आले. यातून त्यांनी बंडखोरी केली. या विरोधात पृथ्वीराज पाटील यांनी पक्षक्षेष्ठींकडे तक्रार केल्याने जयश्रीताईंना काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. अर्थात काँग्रेसमधील अशा कारवाया नंतर मागे घेण्यात येतात पण जयश्रीताई यांना निवडणुकीच्या कालावधीनंतर देखील पुन्हा पक्षात घेतलेले नव्हते.
या पार्श्वभूमीवर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. जयश्रीताई यांच्या मागे जे मदन पाटील यांचे नगरसेवकांचे केडर आहे, त्यामुळे महापालिका क्षेत्रात तर त्यांचं मोठे वर्चस्व असून त्यांचा मोठा गट आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या काही गटात देखील त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. याची योग्य दखल काँग्रेसने घेतलेली दिसत नाही.
कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच जयश्रीताई यांनी आपल्या पक्षात यावं यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांना निमंत्रण दिलं होतं. आणि भाजप देखील त्यांच्या संपर्कात होता. तत्पूर्वी जयंत पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीत त्यांनी यावं यासाठी प्रयत्नशील राहिले होते. पण त्यास कार्यकर्त्यांचा मोठा विरोध राहिला.
मात्र, जयश्रीताई यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन सर्वांच्या अंदाजांना धक्का देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेत आपला मार्ग सुकर करून घेतला आहे. अर्थातच यासाठी जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी आपली ताकद लावली.
नुकतेच भाजपचे जिल्हाध्यक्ष झालेले सम्राट महाडीक या सर्वांचे प्रयत्न त्यांना भाजपकडे खेचण्यात यशस्वी झाले. महाडीक हे देखील जयश्रीताई यांचे जवळचे नातेवाईक आहेत. सांगली जिल्ह्यातील राजकारणात नातेसंबंध फार महत्त्वाचे आहेत. विशाल पाटील यांच्या तर जयश्रीताई या वहिनी आहेत. आमदार विश्वजीत कदम देखील त्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक आहेत.
अर्थात जयश्रीताईंच्या समोर या नात्यांपेक्षाही सध्या मोठा प्रश्न होता तो म्हणजे महापालिकेला आपला गड राखण्यासाठी कोणासोबत जायचे? कारण महापालिकेतून सत्ता जाऊन देखील त्यांना मानणारे नगरसेवक अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत. सत्तेशिवाय कार्यकर्त्यांना टिकवून ठेवता येत नाही हे एक कटू सत्य आहे. आपल्या पतीने निर्माण केलेले हे सर्व केडर कार्यकर्त्यांचे वैभव टिकवण्यासाठी त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असावा हे एक महत्त्वाचं कारण आहे.
वसंतदादा शेतकरी बँकेचं प्रकरण…
मदन पाटील यांच्या कारकिर्दीत वैभवाला असलेली वसंतदादा शेतकरी ही सुमारे ६०० कोटी ठेवी असलेली बँक बुडाली. या सर्वांची वसुली आणि चौकशीची टांगती तलवार तत्कालीन संचालकांवर आहे. भाजपने त्यांना पक्षात घेताना या बँकेच्या कटकटीतून मुक्त करण्याचे वचन दिले असल्याचे दस्तूर खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच बोलता बोलता सर्वांसमोर सांगून टाकले आहे. त्यामुळे हे कारण जरी पडद्यामागचे असले तरी ते आता लपून राहिलेले नाही. या बँकेचे जे अपयश होते त्याचा फटका मदन पाटील यांच्या राजकारणाला मोठा बसला. यामुळे सत्ता गमावून त्यांची राजकारणात पिछेहाट झाली. त्याचे देखील हे एक मोठे कारण होते. अर्थात हा विषय आता तितका ज्वलंत राहिलेला नाही.
अजितदादांची ताकद वाढू लागली
भाजपने आपल्या महायुतीत अजित पवारांना सामावून घेतले असले तरी सांगलीचा त्यांचा गड हा आता पहिल्यापेक्षा मजबूत होत स्वबळाकडे चाललेला आहे. पण काही असंतुष्ट मंडळी ही अजित पवार यांच्या पक्षात जाऊ लागली होती. जतचे माजी आमदार विलासराव जगताप, भाजपशी सलगी असलेले माजी आमदार अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, आणि शिवाजीराव नाईक यांनी नुकताच दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यातच भाजपचे एकेकाळचे आक्रमक नेते माजी खासदार संजय पाटील यांना देखील विधानसभेला राष्ट्रवादीतून तिकीट मिळवावे लागले असल्याने ते देखील राष्ट्रवादीत गेले.
राज्यात सत्ता न राहिल्याने मूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी इथं कमकुवत होत गेल्या तरी अजितदादांची राष्ट्रवादी जोमात निघाली होती. या पार्श्वभूमीवर जयश्रीताई देखील त्यांच्या राष्ट्रवादीत जातील अशी अटकळ बांधली जात होती. पण अजितदादांची राष्ट्रवादी येथे गाफील राहिली आणि भाजपने योग्य संधी साधत त्यांना आपल्याकडे वळवले. आगामी महापालिकेच्या तयारीसाठी भाजपकडे हा हुकमी एक्का असेल यात वाद नाही.
भाजपची ताकद…
भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादीतील रेडिमेड नेते घेऊनच आपली येथील सत्ता मजबूत केली आहे. महापालिका क्षेत्रात भाजपचे दोन आमदार आहेत. लोकसभेला येथे काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील विजयी झाल्यानंतर विधानसभेलाही भाजपला फटका बसेल असा अंदाज होता. मात्र सुधीर गाडगीळ येथून सुमारे ३६००० मतांनी विजयी झाले. अर्थात काँग्रेस विरोधात येथे जयश्रीताईंचे बंड हे भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप झाला होता. आता तर त्याच भाजपमध्ये गेल्याने महापालिकेला काँग्रेस कमकुवत झालेली आहे. पृथ्वीराज पाटील हे जे सध्याचे शहर अध्यक्ष आहेत त्यांचे नगरसेवकांचे स्वतःचे असे केडर अजून तरी निर्माण झालेले नाही. विश्वजीत कदम हेच सध्या काँग्रेससाठी सांगली जिल्ह्यात एकमेव बलस्थान आहेत.
महापालिकेत त्यांची तितकी कमांड नाही. जयंत पाटील यांची एकेकाळी कमांड निर्माण झाली होती, पण सध्या त्यांचेही महापालिकेत मोजकेच नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीत उभी फूट पडून दोन पक्ष असल्याने त्यांच्या राष्ट्रवादीतील बरेच शिलेदार हे अजित पवारांकडे आहेत. संपूर्ण जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद एकाच खानापूर मतदारसंघापुरती आहे. त्यामुळे महायुतीचा विचार केला तर भाजप इथे पूर्ण स्वबळावर निवडणूक लढवू शकतो
भाजपसमोरील अडचणी
चौकशीचा ससेमिरा लागलेल्या अनेक बड्या नेत्यांना भाजपने पक्षप्रवेश करून पवित्र केले आहे. सांगलीच्या बाबतीत देखील जयश्री ताईंच्या गटातील जे काही माजी पदाधिकारी आहेत त्यात काही ‘घोटाळेबाज’ आहेत. आता ताईंनी त्यांना खड्यासारखे बाजूला ठेवले तर प्रश्न येणार नाहीत. यामध्ये बीओटीसारखे बडे गैरव्यवहार आहेत. त्या विरोधात तत्कालीन भाजपचे नेते संभाजी पवार स्वतः रस्त्यावर उतरून लढले आहेत.
आता पवार यांचे चिरंजीव पृथ्वीराज पवार हे भाजपमध्ये पदाधिकारी आहेत. त्यामुळे पूर्वीचे पवार आणि जयश्रीताई हे एकमेकांविरुद्ध लढणारे गट विरोधी भाजपमध्ये एकत्र कसे नांदणार? हा देखील भाजप पुढचा आव्हानाचा मुद्दा असेल. मूळ भाजपवाले देखील सोनेरी टोळीच्या गैरव्यवहारांच्या विरोधात एक काळ रस्त्यावर लढले आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ‘पार्टी विथ डिफ्रन्स’ असे मानणारा त्यांचा पक्ष आणि त्यांनी केलेला हा पक्षप्रवेश त्यामुळे सर्वांना एकत्र बांधणे हे मोठे आव्हान असेल. ”घोटाळेबाजांना भाजपने घेतले” हा हमखास आरोप विरोधक करत राहतील. त्याला उत्तर काय द्यायचे हे भाजपच्या शीर्ष नेतृत्वासकट स्थानिक नेतृत्वाला ठरवावे लागेल. याबाबत युक्तिवाद करणे हे भाजपच्या वकिलांना सोपे नाही. पण एकंदरीत जयश्री ताई यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि विशेषत: महापालिका क्षेत्रात स्वबळाकडे चालला आहे, या आनंदात सध्यातरी भाजप नेतृत्व आहे.