
विधानसभेच्या 5 पोटनिवडणुकांमध्ये कुणाला धक्का बसणार ?
देशातील विविध राज्यांतील पाच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून सातत्याने उलटफेर होत आहे. प्रामुख्याने गुजरात आणि पंजाबमधील प्रत्येक एका विधानसभा मतदारसंघात भाजप आणि आम आदमी पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघात अनुक्रमे आप आणि काँग्रेसकडून धक्कादायक निकालाची नोंद केली जाऊ शकते.
गुजरातमध्ये काय स्थिती?
गुजरातमध्ये विसावदार व कडी मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंतच्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार कडी मतदारसंघात भाजपचे राजेंद्रकुमार छावडा तर विसावदारमध्ये आपचे गोपाल इटालिया आघाडीवर आहेत. या मतदारसंघात सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपचे किरीट पटेल आघाडीवर होते. तर कडीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रमेशभाई छावडा हे 21 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
पंजाबमध्ये काँग्रेसची टक्कर
पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघात आपचे उमेदवार संजीव अरोरा आघाडीवर असून काँग्रसचे भारत आशू हे केवळ 2200 मतांनी पिछाडीवर आहेत. या मतदारसंघातही आप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत आहे. या मतदारसंघ आधीच्या निवडणुकीत आपकडेच होता. प्रत्येक फेरीमध्ये उलटफेर होत असल्याने आपची धाकधूक वाढली आहे.
केरळमध्ये काँग्रेसची आघाडी
सकाळी साडे अकरा वाजेपर्यंतच्या निकालानुसार केरळातील निलांबूर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या आर्यदन शौकत यांनी मोठी आघाडी घेतली आहे. हा मतदारसंघ खासदार प्रियांका गांधी यांच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील आहे. त्यामुळे या निकालाकडे काँग्रेसचे लक्ष लागले आहे. शौकत यांच्याविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एम. स्वराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते सुमारे 10 हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.
तृणमूल विजयाच्या दिशेने
पश्चिम बंगालमधील कालिगंज विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आलिफा अहमद यांची विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. एकूण 23 पैकी 7 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यांनी 19 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार काबिल शेख 13 हजार मतांसह दुसऱ्यास्थानी तर भाजपचे आशिष घोष 12 हजार मतांसह तिसऱ्यास्थानी होते.