
अमेरिकन महिलांना ट्रम्प सरकारचा सल्ला !
वॉशिंग्टन : भारत – पाकिस्तानमधील संघर्ष विराम असो किंवा आणखी काही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प काही काळापासून भारतासंबंधी काही न काही वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत.
आता पुन्हा एकदा त्यांच्या सरकारने भारतासंबंधी एक वादग्रस्त आदेश जारी केला आहे. अचानकच भारतात जाणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी विशेषतः महिलांसाठी एक सल्ला प्रसिद्ध केला आहे. यात भारतात होणारे गुन्हे तसेच बलात्काराच्या घटनांमुळे अधिक सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच दहशतवादाच्या धोक्यामुळे मध्य तसेच पूर्व भारतात न जाण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या या विधानांचे भारतात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात ट्रम्प सरकारने हा सल्ला भारतातील आपल्या नागरिकांना दिला आहे. त्यात म्हटले आहे की, बलात्कार हा भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा अपराध आहे. तसेच पर्यटन स्थळांवर छेडछाडीच्या घटना घडण्यासोबतच हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचेही त्यांचे म्हटले आहे. शिवाय पर्यटन स्थळ, मार्केट, शॉपिंग मॉल, सरकारी कार्यालये यांना निशाणा बनवणारे दहशतवादी कधीही हल्ला करू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
16 जून रोजी ही नियमावली जारी करण्यात आली आहे. भारताच्या ग्रामीण भागात राहात असलेल्या किंवा नोकरीनिमित्त भारतात असलेल्या नागरिकांसाठी ही नियमावली आहे. भारताच्या ग्रामीण भागातील अमेरिकन नागरिकांना मदत करण्यासाठी अमेरिकी सरकारकडे मर्यादित साधने आहेत.भारतात असलेला दहशतवादाचा धोका लक्षात घेता मध्य तसेच पूर्व भारतातील काही भागात जाऊ नये, असेही या नागरिकांना सांगण्यात आले आहे.
दहशतवादासोबतच भारतात नक्षलवादाचा देखील धोका आहे. पूर्व महाराष्ट्र, उत्तर तेलंगणा आणि बंगालच्या पश्चिमेपर्यंत हा नक्षलवाद पसरलेला आहे. छत्तीसगड आणि झारखंडच्या ग्रामीण भागात भारत सरकारच्या अधिकाऱ्यांवर छोटेमोठे हल्ले होत असतात. भारतात काम करणाऱ्या अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांनी बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मेघालय, ओडिशा राज्यातील अनेक भागात जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. या राज्यांच्या राजधानीला भेट देण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही, असेही सांगण्यात आले आहे.