
तब्बल 43 वर्षांनंतर पुन्हा ‘साखर’पर्व सुरू…
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. या विजयाबरोबरच त्यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे.
एखाद्या साखर कारखान्याची निवडणूक लढवून त्यात विजय मिळवत अजितदादा तब्बल 43 वर्षांनंतर संचालक पदावर विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर असताना साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्णयही ऐतिहासिक ठरला.
बारामती तालुक्यातील माळेगाव सरकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या निवडणुकीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. याची दोन महत्वाची कारणे आहेत. पहले म्हणजे स्वत: उपमुख्यमंत्री अजितदादा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर दुसरे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले पॅनेल निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
पहिला निकाल अजितदादांच्या पॅनेलच्या बाजूने लागला. खुद्द अजित पवारांनी विजय मिळवत पॅनेलची विजयी घोडदौड सुरू केली. त्यांनी ब वर्ग गटातून विजय मिळवत वैध 101 पैकी तब्बल 91 मते मिळवली. हा गट सहकारी संस्थांचा आहे. अजित पवारांचा हा विजय अपेक्षितच होता.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बहुतेक संस्थांवर दादांचेच नेतृत्व आहे. त्यामुळे हा गट सर्वाधिक सुरक्षित गट मानला जातो. या गटात कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तरी तो सहज निवडणून आला असतो. पण स्वत: अजितदादा निवडणुकीत लढवत असल्याने त्याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते.
साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रत्यक्ष उमेदवार म्हणून उतरण्याची दादांची ही दुसरी वेळ. पहिली निवडणुकीत त्यांनी भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची लढवली होती. खरंतर राजकीय आयुष्यातीलच त्यांची ही पहिली निवडणूक होती. 1982 मध्ये झालेल्या या निवडणुकीत ते विजयी झाले आणि कारखान्याचे संचालक बनले. त्यानंतर तब्बल 43 वर्षांनंतर ते एखाद्या कारखान्याचे संचालक बनले आहेत. त्याआधी 1991 मध्ये ते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष बनले होते. जवळपास 16 वर्षे ते या पदावर होते.
आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशी दादांची वाटचाल राहिली आहे. पण त्याची सुरूवात सहकारातून झाली होती. आता पुन्हा 43 वर्षांनंतर ते साखर कारखान्याच्या संचालक पदावर विराजमान झाले आहेत. ‘अजितदादा म्हणजे पक्का वादा’ असे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. आता ते कारखान्याचे संचालक झाल्याने माळेगावच्या प्रत्येक निर्णयाकडे सहकार क्षेत्राचे, प्रामुख्याने राज्यातील इतर साखर कारखान्यांचे लक्ष असणार आहे.