
आमदार अहिरे यांनी काढली खरडपट्टी !
राज्यात सध्या विविध भागातून वारकरी पंढरपूरला निघाले आहेत. वारकऱ्यांच्या अनेक दिंड्या पंढरपूरच्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहेत. या वारकऱ्यांचे ठिकठिकाणी टोल नाक्यावर चांगलेच वाद होऊ लागले आहेत.
आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातून हजारो दिंड्या पंढरपूरकडे जातात. वारकऱ्यांच्या या वाहनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आकारू नये असे आदेश काढले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांच्या वाहनांना टोल वसुली करण्यावरून अनेक ठिकाणी वाद झाल्याच्या घटना आहेत.
नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाक्यावर असे वाद वारंवार होत आहेत. वारकऱ्यांच्या वाहनांना मुख्यमंत्र्यांच्या पत्राची मागणी करीत टोल आकारणी केली जाते. याबाबत अनेक वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत अनेक वारकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या आहेत. याबाबत थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांना हस्तक्षेप करावा लागला.
नाशिक येथील कीर्तनकार आडके हे सोमवारी वारीला जात असताना त्यांचे वाहन या टोलनाक्यावर आढळण्यात आले. त्यामुळे आडके आणि टोल नाकाच्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. टोल माफी असल्याचे पत्र दाखवा नंतरच टोलमाफी मिळेल, असे नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अडके यांना सुनावले.
यावेळी कीर्तनकार आडके यांनी थेट आमदार सरोज जाहिरे यांच्याशी संपर्क केला. आमदार अहिरे यांना देखील कर्मचाऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या टोलमाफीचे पत्र आडके यांच्याकडे नाही, असे सांगत टोलमाफी न देण्याचे समर्थन केले. त्यावरून आमदार अहिरे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला असताना वारकरी कोण हे ओळखता येत नाही का? वारकरी पंढरपूर सोडून जाणार तरी कुठे? त्यांना त्रास का देता? असे सांगत वारकऱ्यांच्या वाहनांना टोल अकारू नये असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याने नमते घेत टोल ना आकारता संबंधित गाडी सोडण्याचे मान्य केले.
टोल नाक्यावरील कर्मचारी आणि आमदार सरोज अहिरे यांच्यात झालेला दूरध्वनीवरील संवाद चांगला चर्चेचा विषय बनला आहे. तर अहिरे यांच्या समर्थकांनी तो समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. फेसबुक वर या ऑडिओ क्लिप ची चांगलीच चर्चा असून अनेक नागरिकांनी त्याला दाद दिली आहे.