
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफओच्या सदस्यांना एक आनंदाची बातमी दिलीय. सदस्यांना आता अॅडव्हान्स रक्कमची मर्यादा वाढवलीय. ईपीएफओने आगाऊ क्लेमसाठी ऑटो-सेटलमेंट मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केलीय.
याबाबतची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलीय. ईपीएफओच्या निर्णयामुळे लाखो सदस्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कोरोना महामारीच्या काळात सदस्यांना अगाऊ रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती. सदस्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ईपीएफओने अॅडव्हान्स क्लेमची सोय केली होती. या निर्णयामुळे मॅन्युअल पडताळणीशिवाय रक्कम काढता येणार आहे. सदस्यांना जलद आर्थिक मदत देण्यासाठी ईपीएफओने आधी कोरोनाच्या काळात आगाऊ दाव्यांचे ऑटो-सेटलमेंट सुरू केले होते.
ऑटो-सेटलमेंट मर्यादेत वाढ झाल्यामुळे, सदस्यांना तात्काळ ५ लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येतील. आतापर्यंत सदस्यांना १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आगाऊ काढण्यासाठी मॅन्युअल पडताळणीची वाट पहावी लागत होती. नॉन-ऑटो सेटलमेंटसाठी ईपीएफओ ग्राहकांना ईपीएफओ कार्यालयांना भेट द्यावी लागत होती.
तसेच मॅन्युअल मंजुरीसाठी वाट पहावी लागत होती, त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ होती. मार्च २०२५ मध्ये, केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी समितीने (EC) ASAC मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलीय. मे २०२४ मध्ये ASAC ची मर्यादा ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आली होती. यामुळे EPFO सदस्यांचे राहणीमान वाढले.
पीएफ ॲडव्हान्स रक्कम ऑनलाइन काढण्यासाठी EPFO च्या UAN सदस्य पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल. तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल. त्यानंतर, ‘ऑनलाइन क्लेम (फॉर्म 31)’ पर्याय निवडून आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून घ्या.