
लोकांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु या प्रदेशात तीन दशकांपासून सुरू असलेल्या इराणी आक्रमणाकडे दुर्लक्ष करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे अशी भूमिका इस्त्रायलचे भारतातील राजदूत रूवेन अझर्म यांनी व्यक्त केली आहे.
कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी इराणला पाठिंबा दिल्यानंतर इस्त्रायलच्या राजदूतांनी त्यांचे मत मांडले आहे.
रुवेन यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की राजकारण्यांनी जागरूक असले पाहिजे. ऑक्टोबरमध्ये इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्यांचा ज्या पद्धतीने निषेध करायला हवा होता त्या पद्धतीने त्यांनी निषेध केला नाही हे पाहून आम्हाला निराशा झाली.
लोकांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु आपण वास्तव आणि तथ्यांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून सर्वांना समजेल की इराण आक्रमक देश आहे. जेव्हा इराण आम्हाला नष्ट करण्यासाठी शस्त्रे मिळवणार होता, तेव्हा इस्रायलकडे कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे अध्यक्ष यांच्यातील चर्चेच्या प्रश्नावर रुवेन म्हणाले की जर इराण इतर देशांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यापासून परावृत्त असेल, त्यांचे अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम संपवण्यास वचनबद्ध असेल आणि या प्रदेशात त्यांचे आक्रमण थांबवण्यास वचनबद्ध असेल, तर आपण निश्चितपणे राजनैतिकतेकडे परत जाऊ शकतो.
इस्रायल अयातुल्ला अली खामेनी यांना संपवणार का असे विचारले असता, रूवेन म्हणाले की आम्ही कोणताही पर्याय सोडणार नाही. अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये अणुस्थळे सुरक्षित असल्याच्या इराणच्या दाव्यावर, इस्रायली राजदूत म्हणाले की इराण त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे.
ते म्हणाले की इस्रायली आणि अमेरिकन हल्ले अगदी अचूक आहेत. इराणने समृद्ध युरेनियम काढून टाकले असले तरी, आम्ही त्यांची युरेनियम समृद्ध करणारी केंद्रे नष्ट केली आहेत. असे असले तरी त्यांच्याकडे अजूनही युरेनियम आहे व हे त्यांनाच धोक्यात आणणारे आहे.
त्यांनी ते युरेनियम देशाबाहेर पाठवावे. जर त्यांनी नकार दिला तर त्यांना इस्रायल किंवा अमेरिकेकडून पुढील हल्ल्यांना सामोरे जावे लागेल. त्यांनी असेही म्हटले की पश्चिम आशियामध्ये भारताला शांतता आणि विकासाचा एक चांगला आणि सकारात्मक देश म्हणून पाहिले जाते.