
माळेगाव कारखान्याच्या निकालानंतर जोरदार सेलिब्रेशन…
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे.
त्यामुळे अजित पवारांच्या समर्थनक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत रस्त्यावर एकच जल्लोष सुरु केला आहे. सध्या निळकंठेश्वर पॅनलच्या समर्थकांकडून जोरदार घोषणबाजीला सुरुवात झाली आहे. ‘अरे सांगवीला सांगा, माळेगावला सांगा, चेअरमन आमचा अजितदादा…. अरे एकच वादा, अजितदादा… आला रे आला दादाच आला’, अशा घोषणांनी माळेगाव कारखान्याचा परिसर दणाणून गेला आहे.
अजित पवार हे स्वत: माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी बारामतीत ठाण मांडून या निवडणुकीसाठी प्रचार केला होता. तसेच अजितदादांनी माळेगाव साखर कारखान्यासाठी 500 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती. याचा अपेक्षित परिणाम मतदारांवर झालेला दिसत आहे. आज मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलची सरशी होताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनल यांच्यासमोर शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांची पॅनेल्स रिंगणात होती. मात्र, अजित पवार यांच्या पॅनेलला एकहाती सत्ता मिळण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या अजित पवार यांच्या पॅनलचे तीन उमेदवार विजय घोषित करण्यात आले आहेत. तर उर्वरित जागांवरही बहुतांश ठिकाणी अजित पवार यांच्याच पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे निळकंठेश्वर पॅनेलला सहजपणे बहुमत मिळेल, असा अंदाज आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणाकोणाचा विजय?
मंगळवारी मतमोजणीच्या पहिल्या दिवशी ब प्रवर्गातून अजित पवार विजयी झाले होते. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणीला पुन्हा सुरुवात झाली होती. यावेळी अजित पवार यांचे दोन उमेदवार विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतन कुमार साहेबराव भोसले विजयी झाले आहेत . तावरे गटाचे बापूराव आप्पा गायकवाड पराभूत झाले आहेत. रतन कुमार साहेबराव भोसले यांनी 1487 मतांनी बापूराव आप्पा गायकवाड यांचा पराभव केला.
इतर मागासवर्गीय प्रवर्गातून अजित पवारांच्या पॅनलचे नितीन शेंडे 8494 मतं मिळवून विजयी झाले. त्यांनी सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांचा 1153 मतांनी पराभव केला. त्यांना 7341 मतं मिळाली. त्यामुळे आतापर्यंत अजित पवार यांच्या पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.