
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :“क्रीडामंत्री साहेब… आमच्या शाळेत जाणारा रस्ता प्रश्न सोडवा!”
या मथळ्याखाली चालु वार्ता या दैनिकाने जून २०२४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमधून भगीरथ राजा नगर ते कमलेश्वर शाळेकडे जाणाऱ्या मार्गावरील दयनीय स्थितीचा आक्रोश मांडण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे हाल, नागरिकांची धडपड, आणि चिखलाच्या रस्त्याने होणारी धोकादायक वाहतूक चालु वार्ता ने वृत्तबद्ध करत सार्वजनिक चर्चेचा विषय बनवला होता.
या बातम्यांची अखेर गांभीर्याने दखल घेत, माजी कॅबिनेट मंत्री, लोकप्रिय आमदार संजय बनसोडे यांनी प्रभाग क्रमांक ४ मधील विविध गल्ल्या, बोळ, नाल्या आणि मुख्य शाळेच्या रस्त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामांचा शुभारंभ केला आहे.
दिनांक २५ जून २०२५ रोजी या कामांचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि जिल्हा नियोजन समितीचे शासन नियुक्त सदस्य प्रा. डॉ. श्यामभाऊ डावळे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी शहराध्यक्ष सय्यद जानीभाई, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, राजकुमार भालेराव, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कामांतर्गत भगीरथ राजा नगर, आजाद नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, अल्पसंख्याक वस्तीतील नाल्यांचे बांधकाम, सिमेंट काँक्रिट रस्ते, कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण यांचा समावेश आहे.
स्थानिक नगरसेवक अनिल मुदाळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कामांना मंजुरी मिळवली. प्रभागातील नागरिकांनी आमदार संजय बनसोडे व नगरसेवक मुदाळे यांचे आभार मानले आहेत.
या भागाला भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांनंतरही योग्य रस्ता नव्हता. चालु वार्ता ने हे वास्तव अधोरेखित केल्याने जनतेचा आवाज शासनदरबारी पोहोचला आणि आज प्रत्यक्षात विकासाची पावले पडू लागली आहेत.
चालु वार्ता चे सामाजिक भान आणि जिद्दी पत्रकारितेमुळेच या दुर्लक्षित भागाला आशेचा किरण मिळाला आहे, हे स्थानिक नागरिकांनी समाधानाने नमूद केले.
_______________
चालु वार्ता
सत्यासाठी आवाज, विकासासाठी पत्रकारिता