
पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरातील चोविसावाडीत गुरुवारी (26 जून) सकाळच्या सुमारास एका विहिरीत 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती.
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाने दाखल होत शोधमोहीम राबवत मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक तपासानुसार आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकं घडलं काय?
वैष्णवी संतोष इंगवले असं मृत तरुणीचं नाव असून, ती 25 जूनपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस तपास करत असतानाच तिच्या ठिकाणाजवळील एका विहिरीच्या काठावर ओढणी आढळून आली. त्यामुळे पोलीस आणि कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला. यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. विहिरीत अंदाजे 45 फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा टाकून शोध सुरू करण्यात आला. काही वेळातच त्या कॅमेऱ्यात वैष्णवीचा मृतदेह दिसून आला.
अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला असून, शवविच्छेदनासाठी तो रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वैष्णवीने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तिच्या घरच्यांकडूनही कोणतीही ठोस माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर वैष्णवीच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेने चोविसावाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एक तरुणी अशा प्रकारे अचानकपणे निघून जाणं, आणि मृतदेह विहिरीत सापडणं, या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आत्महत्येचा फक्त अंदाज असून, यामागचं नेमकं कारण समजण्यासाठी पोलीस विविध शक्यतांचा तपास घेत आहेत.
शाळेच्या मधल्या सुट्टीतच शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल
जळगावच्या पाचोऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुपडू भादु विद्या मंदिर शाळेतील ही घटना असून रवींद्र महाले असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुपडू भादु विद्या मंदिर शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान विद्यार्थी प्रांगणात खेळत होते. यावेळी शिक्षक रवींद्र महाले यांनी दुसऱ्या मजल्यावरील वर्ग खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. मधली सुट्टी संपल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्र महाले हे वर्गात आढळून आले आहे.