
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
डहाणू, २५ जून २०२५ – संत गाडगे बाबा आश्रम शाळा, दाभोण येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या वतीने माजी राज्य मंत्री तसेच माजी समाज कल्याण सभापती मनीषाताई निमकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
मुख्य रस्त्यापासून कार्यक्रम स्थळापर्यंत ढोल-लेझीमच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर पुष्पगुच्छ आणि प्रबोधनकार ठाकरे लिखित “संत गाडगे बाबा” पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.मनीषा निमकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि भावनिक भाषणातून मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या बालपणातील संघर्षमय प्रसंग सांगून उपस्थितांचे मन जिंकले. “मीही अशाच परिस्थितीतून मोठी झाले आहे, शिक्षणाच्या जोरावरच आयुष्यात यश मिळवता येते,” असे सांगत विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा दिली.
कार्यक्रमात शाळेच्या संचालक, मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनीही आपल्या भाषणातून ताईंचे मनःपूर्वक आभार मानले. “निमकरताई प्रत्येक संकटाच्या वेळी संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाला मनीषाताईंच्या सोबत शालिनी मेनन उपस्थित होत्या. त्यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याशिवाय, युवाशक्ती ग्रामविकास संगठन चे कोकण विभाग अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते समशेर माणेशिया यांचा देखील सत्कार करण्यात आला.कार्यक्रम अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि उत्साहात पार पडला. उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.