
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी – विकी जाधव
—————————–
__________________
मुंबई, दि. २६ : ‘महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’च्या दोन खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथे झाले. ही पुस्तिका राज्य प्रशासनासाठी एक अभूतपूर्व व महत्त्वपूर्ण पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘कर्मयोगी भारत’ या उपक्रमाला बळ देणारी आहे, असे सांगून अधिकर्त्यांबरोबरच नागरिकांना देखील ही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व इतर महसूल अधिकारी यांना विविध कामे करताना सुलभतेसाठी कायदे व नियम यासंदर्भातील हँडबुक तयार करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला होता. त्यानुसार महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगावचे अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे तसेच कोकण विभागाचे सहायक आयुक्त रविंद्र पवार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या हस्तपुस्तिकांच्या कामाचे कौतुक केले.
विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या दोन खंडांमध्ये महसुली कामे (खंड 1) आणि बिगर महसुली कामे (खंड 2) यांचा समावेश असून एकूण 24 प्रकरणे असल्याची माहिती दिली.