
पुणे सायबर पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय सायबर ठगाला मुंबई विमानतळावरून बेड्या ठोकल्या आहेत. शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनियल वेबसाइटवरून ओळख वाढवून त्याने एका महिलेची तब्बल तीन कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केली होती.
महिलेला लग्नाचे वचन देऊन, परदेशात व्यवसाय वाढवण्याचे आमिष दाखवत आरोपीने तिच्याकडून ही रक्कम उकळली होती.
डॉ. रोहित ओबेरॉय उर्फ अभिषेक शुक्ला (मूळ भारतीय, सध्या स्थायिक- ऑस्ट्रेलिया) असे सायबर ठगाचे नाव आहे. शुक्ला याने बनावट प्रोफाईल तयार करून तब्बल 3 हजार 194 महिलांना संपर्क केल्याचे तपासात पुढे आले आहे.
दिल्लीतील एक महिला पुण्यात खराडी येथे काही काळ वास्तव्यास होती. तिने शादी डॉट कॉमवर लग्नासाठी प्रोफाइल तयार केले होते. 2023 मध्ये आरोपीने डॉ. रोहित ओबेरॉय नावाच्या प्रोफाइलद्वारे महिलेला मेसेज केला होता. स्वतःला ऑस्ट्रेलियात राहणारा डॉक्टर असल्याचे सांगून त्याने महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तो पुण्यात आला. दोघे काही काळ पुण्यासह भारतात इतर ठिकाणी एकत्र राहिले.
या महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून पाच कोटी रुपयांची पोटगी मिळाली होती. ती या पैशांतून लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम सुरू करणार होती. ही माहिती आरोपीला कळाल्यावर त्याने तिचा विश्वास संपादन करून, तिच्या व्यवसायासाठी सिंगापूरहून गुंतवणूक मिळवून देतो,असे सांगितले. त्यासाठी ‘इव्हॉन हँदायनी’ आणि ‘विन्सेंट कुआण’ नावाच्या बनावट लोकांची ओळख करून दिली.
या तिघांनी मिळून पीडित महिलेला सिंगापूर आणि भारतातील विविध बँकांमध्ये टप्प्याटप्प्याने तीन कोटी 60 लाख रुपये भरायला लावले होते. पुणे सायबर पोलिसांनी यातील अभिषेक शुक्ला याला अटक केली आहे. ही कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त विवेक मिसाळ, सहायक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सुशिल डमरे, पोलिस हवालदार बाळासो चव्हाण, संदिप मुंढे, नवनाथ कोंडे, सतीश मांढरे, पोलिस अंमलदार संदिप यादव, संदिप पवार, अमोल कदम, सचिन शिंदे यांनी केली.
मृत्यूचा रचला बनाव
पैसे मिळाल्यानंतर काही कालावधीने आरोपी ऑस्ट्रेलियाला गेला आणि महिलेशी संपर्क टाळू लागला. त्याने आपल्याला तोंडाचा कर्करोग झाल्याचे सांगितले होते. काही महिन्यांनी ‘विन्सेंट कुआण’ या नावाने महिलेला एक ई-मेल आला. त्यामध्ये ‘डॉ. रोहित’ यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पीडित महिलेला त्याबाबत संशय आला. महिलेने मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
डॉ. ओबेरॉय नव्हे, अभिषेक शुक्ला
फसवणूक झाल्याचे कळाल्यावर महिलेने तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपासात ‘डॉ. रोहित ओबेरॉय’ हे नाव बनावट असून, त्याचे खरे नाव अभिषेक शुक्ला असल्याचे समोर आले. तो मूळचा लखनऊचा असून सध्या ऑस्ट्रेलियात पर्थ येथे स्थायिक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्वीकारले असून, तेथे लग्नही केलेले आहे. त्याला दोन मुले आहेत.
तक्रार करण्याचे पोलिसांचे आवाहन
मॅट्रिमोनियल साईट शादी डॉट कॉम प्रोफाईल नं. एसएच 8741231 यावरुन डॉ. रोहित ओबेरॉय नामक व्यक्तीकडून महिलांची आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाणे (मो. नं. 7058719371/75) यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.
महिलांनी मॅट्रिमोनियल साईटवर लग्नाकरीता त्यांचे प्रोफाईल तयार केले असेल तर समोरील व्यक्तीने त्यांना त्यांचे प्रोफाईलद्वारे संपर्क केला तरी समोरील व्यक्तीबाबत प्रथम खात्री करावी. तसेच आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगावी.
मॅट्रिमोनियल साईटद्वारे महिलेला संपर्क साधलेला व्यक्ती हा बाहेर देशातील असल्याचे त्याने सांगितले असल्यास व तो भारतात आल्यावर त्याला कस्टम विभागाने पकडले आहे, असे खोटे सांगून त्याला सोडविण्यासाठी महिलांकडून आर्थिक रकमेची मागणी करुन फसवणूक करत असतो, अशा खोट्या बतावणीला महिलांनी बळी पडू नये.
सिंगापूरहून मुंबईत आला अन् अडकला
पुणे पोलिसांनी अभिषेक शुक्ला याच्या नावाने लुक आऊट सर्क्युलर तात्काळ जारी केले होते. शुक्ला याने सिंगापूरहून मुंबईला येण्यासाठी विमान तिकीट बुक केले. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो सिंगापूरहून मुंबईत आल्याचे समजल्यावर पोलिस उपनिरीक्षक सुशिल डमरे व पथकाने त्याला मुंबई विमानतळावर ताब्यात घेऊन अटक केली.
सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना डॉ. रोहित ओबेरॉय ऊर्फ अभिषेक शुक्ला याने शादी डॉट कॉम वर फेक प्रोफाईल तयार करुन तब्बल 3 हजार 194 महिलांना मेसेजद्वारे संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या आरोपीने आणखी किती महिलांना लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घातला आहे, याचाही तपास केला जात आहे.