
मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेचे प्रमुख राज ठाकरे व उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
त्यानंतर मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याने येत्या काळात राज्यातील राजकारण येत्या काळात 360 डिग्रीमध्ये फिरले आहे.
राज व उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार नसल्याचा अनेकांचा अंदाज या दोघांनी फोल ठरवला असून 5 जुलैला एकत्रित मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील राजकारणाने आता कूस बदलली असून ठाकरे बंधू मोर्चासाठी एकत्र येणार असल्याचे समजताच भाजपने मोठं पाऊल उचलले आहे. तातडीने कोअर कमिटीची बैठक घेत मराठी-हिंदी वाद टाळण्यासाठी भाजपने वेगळे प्लॅनिंग केले आहे. येत्या काळात मुंबई महापलिकेच्या निवडणूका तोंडावर असल्याने मराठी-हिंदी वादाचा फटका बसू नये यासाठी सावधपणे पावले उचलली जात असतानाच आता मराठी-हिंदी वाद टाळण्यासाठी भाजपने केलेल्या वेगळ्या प्लॅनिंगला मनसेने ‘जशास तसे’ उत्तर देत जोरदार हल्ला चढविला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचवेळी राज ठाकरे यांनी कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे वक्तव्य करीत राज ठाकरे यांनी बंधू उद्धव ठाकरेंना टाळी दिली होती.
चार महिन्यापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठीसाठी वाद विसरून ऐकत येणार असल्याचे स्पष्ट केले होते. ती घोषणा आता त्यांनी या मोर्चाच्या निमित्ताने खरी करून दाखवली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे आता येत्या काळात भाजपने रणनीती बदलली असून दोन ठाकरेंचा मुकाबला करण्यासाठी ताकही फुंकून पिले जाणार आहे.
मुंबई महापलिकेच्या निवडणूकात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतलेली भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजपची मदार हिंदीभाषिक मतदारावर आहे तर मनसे व ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मराठी भाषिकांची मते महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे हिंदी भाषा सक्ती करता आली नाही तर भाजपला निवडणूक जड जाणार आहे. त्यामुळेच ऐन निवडणूक काळात हा मुद्दा कळीचा ठरणार असल्यानेच ठाकरे बंधूंनी भाजपची कोंडी केली आहे.
राज्यातील शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत पहिलीपासून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी होऊन देणार नाही, असा निर्धार राज ठाकरे यांनी केला आहे. यासाठी येत्या 5 जुलै रोजी राज ठाकरे यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली. या मोर्चात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मोर्चा काढण्याच्या घोषणेनंतर भाजपच्या अंतर्गत वर्तुळात वेगवान हालचाली सुरु झाल्या असून भाजपने मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे.
या बाबत शुक्रवारी सकाळीच भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठक पार पडली. या बैठकीत रणनीती ठरवण्यात आली आहे. भाजपने केलेल्या प्लॉनिंगनुसार मराठी-हिंदीवरुन सुरु असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा मुद्दा पुढे करुन शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. त्या माध्यमातून येत्या काळात मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे.
वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय झाला, ही गोष्ट भाजप ययेत्या काळात नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने त्याचा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कसा फायदा होणार, याचे महत्त्व भाजपकडून लोकांमध्ये जाऊन सांगितले जाणार आहे. त्यासाठी येत्या काळात भाजपकडून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे भाजपची ही रणनीती यशस्वी होणार का? सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
मनसेकडून भाजपवर जोरदार हल्ला
अभिजात भाषा म्हणजे मुळ भाषा असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी ती भाषा समृद्ध असावी लागते, त्या भाषेतील साहित्य समृद्ध असावे लागते, त्या भाषेला इतिहास हवा, या अटी पूर्ण केल्याशिवाय कोणीही कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देऊ शकत नाही. मग नरेंद्र मोदी असो की डोनाल्ड ट्रम्प असो. हिमंत असेल तर गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दाखवा, असे आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपला केले. मनसेने अभिजात भाषेच्या दर्जावरून भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. त्यामुळे येत्या काळात वातावरण तापण्याची शक्यता आहे.