
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी -बापू बोराटे
पुणे (इंदापूर):-शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा संभाजी ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड पक्षाकडून होणाऱ्या एकेरी उल्लेख थांबवण्याबाबत भव्य बाईक रॅली व मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने शिवभक्त तसेच शिवप्रेमी सहभागी झाले होते. या रॅलीचे नेतृत्व शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपकआण्णा काटे व भाऊसाहेब आंधळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते .
यावेळी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पुत्र तसेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहेत, सकल हिंदू समाजाच्या आरक्षणासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे संपूर्ण हिंदू समाजाने त्यांना धर्मवीर ही उपाधी बहाल केले आहे परंतु संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष सातत्याने छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत असून हा प्रकार महाराष्ट्रातील करोड शिवभक्त आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असलेल्या जनतेच्या भावना दुखावणारा आहे. याशिवाय या संघटनेच्या नावामुळे अनेक नागरिक अनावधानाने संभाजी महाराजांचा अपमान करत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मिता धोक्यात आली आहे.
या निवेदनामध्ये त्यांनी काही प्रमुख मागण्या मांडलेल्या आहेत. यामध्ये १)संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण नाव वापरावे किंवा संघटनेचे नाव बदलावे.
२)जर त्यांनी नाव बदलण्यास नकार दिला तर या संघटना व पक्षाची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात यावी .
३) छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी व तातडीने योग्य ती कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी शिवधर्म फाउंडेशन यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय वरती या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपकआण्णा काटे यांनी केली आहे. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर शिवधर्म फाउंडेशन अधिक व्यापक स्वरूपात मोर्चा उभारेल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनावरती राहील असे यावेळी दिपकआण्णा काटे यांनी सांगितले.