
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना अजूनही अनेक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे उदगीर तालुकाध्यक्ष आणि कीर्तनकार डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केला आहे.
युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवडे यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना डॉ. तेलगाने यांनी समाजहितासाठी समर्पित कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. तेलगाने म्हणाले, “‘हर घर मोदी, घर घर मोदी’ या विचारधारेतून प्रेरणा घेऊन केंद्र शासनाच्या विविध योजना – उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, शौचालय योजना, घरकुल योजना – यांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. योजनांची माहिती मिळाली तरच गरजू जनतेला प्रत्यक्ष फायदा होईल.”
ते पुढे म्हणाले की, “विरोधकांकडून योजनांबाबत चुकीची माहिती पसरवली जाते. यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो. अशा अफवांना उत्तर देण्यासाठी आणि जनजागृतीसाठी राष्ट्रीय मोदी सेवा समिती सक्रियपणे कार्य करणार आहे.”
कार्यक्रमात प्रास्ताविक करताना अमोल निडवडे यांनी सांगितले की, “डॉ. तेलगाने हे सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या तालुकाध्यक्षपदाच्या निवडीमुळे संघटनाला बळ मिळणार आहे. त्यांचा मोठा जनसंपर्क आणि कीर्तनकार म्हणून प्रभाव उपयोगी ठरणार आहे.”
डॉ. तेलगाने यांनी यावेळी समाजासाठी “स्वार्थ आणि परमार्थ यांची सांगड घालणारे नेतृत्व” देण्याचा संकल्प व्यक्त केला. “धर्मो रक्षति रक्षतः या विचाराने प्रेरित होऊन आपण कार्यरत आहोत. शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करताना जनतेच्या हिताचा विचार केंद्रस्थानी राहील,” असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “एक स्वतंत्र संघटनात्मक फळी उभारून प्रशिक्षण, प्रचार, संपर्क आणि प्रभावी माहिती देण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. केवळ राजकारणासाठी नव्हे, तर समाजकारणासाठीही ही संस्था कार्य करणार आहे.”
कार्यक्रमात डॉ. तेलगाने यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन साधेपणात, पण सामाजिक संदेश देणाऱ्या वातावरणात झाले.